Spain vs Belgium Fifa World Cup Quarter Final 2026: फिफा वर्ल्डकप स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. या स्पर्धेतील क्वार्टर फायनलच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. फ्रान्सने आधीच सेमी फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. तर दुसऱ्या क्वार्टर फायनलच्या सामन्यात स्पेनने बेल्जियमचा धुव्वा उडवत सेमी फायनलमध्ये दमदार प्रवेश केला आहे. लॉस एंजेलिस स्टेडियममध्ये पार पडलेल्या या सामन्यात स्पेनने २-१ ने बाजी मारली. दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत सुरू होती. पण पुन्हा एकदा सुपर सब्स्टिट्यूट म्हणून मैदानात उतरलेल्या मिकेल मेरिनोने ८८ व्या मिनिटाला निर्णायक गोल केला आणि स्पेनला २-१ ने विजय मिळवून देत सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला.

हा विजय स्पेनसाठी अतिशय खास आहे. कारण गेल्या ३६ सामन्यांपासून स्पेनने आपली विजयी मालिका सुरू ठेवली आहे. सेमी फायनलमध्ये स्पेनचा सामना बलाढ्य फ्रान्सविरुद्ध होणार आहे. दोन्ही संघ दमदार फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे हा या स्पर्धेतील सर्वात रोमांचक सामना असू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कोणता संघ बाजी मारणार आणि अंतिम फेरीत प्रवेश करणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

या सामन्यात स्पेनकडून रुईज आणि मेरीनोने २ निर्णायक गोल केले. स्पेनचा सर्वाधिक चर्चेत असलेला खेळाडू लामिन यामलला एकही गोल करता आला नाही. पण त्याने बेल्जियमच्या खेळाडूंना पूर्ण सामन्यात गुंतवून ठेवलं आणि स्पेनला गोल करण्याची संधी निर्माण करून दिली.

या सामन्यात स्पेनच्या प्रशिक्षकांनी धाडसी निर्णय घेत, पेड्रीला विश्रांती देऊन, फॅबियन रुईजला मैदानात उतरण्याची संधी दिली. हा निर्णय अतिशय योग्य ठरला. कारण सुरुवातीच्या ३० व्या मिनिटाला रुईजने गोल करून स्पेनला १-० ने आघाडी मिळवून दिली. त्यानंतर यामालने गोल करण्याची संधी निर्माण करून दिली होती. पण ही संधी थोडक्यात हुकली.

पहिल्या हाफ संपणार त्याआधीच बेल्जियमने दमदार पुनरागमन केलं. डी केटेलारेने ४१ व्या मिनिटाला दमदार गोल केला आणि बेल्जियमला १-१ ने बरोबरीत आणलं. त्यानंतर दोन्ही संघ गोल करण्यासाठी संघर्ष करताना दिसून आले. त्यानंतर जवळपास ३० मिनिटे एकही गोल झाला नव्हता. शेवटी ८८ व्या मिनिटाला मिकेल मेरिनोने दमदार गोल केला आणि स्पेनला २-१ ने आघाडी मिळवून दिली. मुख्य बाब म्हणजे तो ८६ व्या मिनिटाला मैदानात उतरला होता. बेल्जियमचा संघ बरोबरी करू शकला नाही. शेवटी स्पेनने हा सामना २-१ च्या फरकाने जिंकून सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे.