scorecardresearch

Premium

मणक्याच्या दुखापतीवर मात करुन कोल्हापूरच्या शाहुची जिगरबाज कामगिरी, युथ ऑलिम्पिकमध्ये पटकावलं रौप्यपदक

शाहुने भारताला मिळवून दिलं पहिलं पदक

2017 साली आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केल्यानंतर शाहुची कोल्हापुरात मिरवणूक काढण्यात आली होती. (संग्रहीत छायाचित्र)
2017 साली आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केल्यानंतर शाहुची कोल्हापुरात मिरवणूक काढण्यात आली होती. (संग्रहीत छायाचित्र)

अर्जेंटिनाच्या ब्युनास आयर्स येथे सुरु असलेल्या युथ ऑलिम्पिक स्पर्धेत कोल्हापूरच्या शाहु मानेने भारताला पहिलं पदक मिळवून दिलं. 10 मी. एअर रायफल प्रकारात शाहुने रौप्यपदकाची कमाई केली, पात्रता फेरीत तिसरं स्थान मिळवलेल्या शाहुला अंतिम फेरीत अवघ्या 1.7 गुणांच्या फरकाने सुवर्णपदक गमवावं लागलं. मात्र अनेक अडचणींवर मात करुन शाहुने युथ ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली आहे.

शाहु कोल्हापुरच्या शिवाजी पेठेतील सरदार तालिम परिसरात राहतो. शाहु पाचवीत असताना त्याने नेमबाजी खेळाकडे वळावं अशी त्याच्या मित्रांची इच्छा होती, मात्र हा खेळ महागडा असल्यामुळे सुरुवातीला आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र कालानुरुप तो या खेळाकडे ओढला गेलाच. कोल्हापुरातल्या दुधाळी रेंजवर शाहुने सरावाला सुरुवात केली, यानंतर केवळ सराव आणि मेहनतीच्या जोरावर शाहुने हे यश मिळवलं आहे. शाहुची आई आशा माने यांनी लोकसत्ता ऑनलाईनच्या प्रतिनीधींशी संवाद साधला.

अवश्य वाचा – कोल्हापूरचा मावळा युथ ऑलिम्पिकमध्ये चमकला, शाहु मानेला नेमबाजीत रौप्यपदक

आतापर्यंत शाहुने 4 जागतिक स्पर्धांमध्ये सतत पहिल्या 3 क्रमांकात येण्याची कामगिरी केली आहे, त्यामुळे या स्पर्धेतही तो चांगली कामगिरी करेल असा आम्हाला आत्मविश्वास होता. हा आत्मविश्वास त्याने सिद्ध करुन दाखवल्यामुळे त्याचा आम्हाला अभिमान आहे, आपल्या मुलाचं कौतुक करताना आशा मानेंना आनंद गगनात मावत नव्हता. शाहुचे आई-वडील कोल्हापुरात मेडीकल स्टोअर चालवतात.

गेली दीड वर्ष शाहुला मणक्याचा त्रास होता होता. मात्र या त्रासावर मात करत तो या स्पर्धेत उतरला. शेवटचे दोन शॉट खेळताना तो जरासा चाचपडला, मात्र त्याने दुखापतीवर मात करुन जे यश मिळवलं आहे त्याचा आम्हाला नक्कीच आनंद आहे, शाहुचे वडील तुषार पाटील आपल्या मुलाचं कौतुक करत होते. शाहुच्या या कामगिरीनंतर अनेक मान्यवर नेमबाजपटूंनीही त्याचं कौतुक केलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fighting with his injury kolhapur boy shahu mane bags silver medal in youth olympic

First published on: 08-10-2018 at 10:05 IST

आजचा ई-पेपर : कोल्हापूर

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×