scorecardresearch

प्रो लीग हॉकी (पुरुष) : भारताचा जर्मनीवर शानदार विजय

या दोन विजयांसह भारताने प्रो लीगमधील मायदेशातील मोहिमेची विजयी सांगता केली आहे.

भुवनेश्वर : भारतीय पुरुष हॉकी संघाने शुक्रवारी अननुभवी जर्मनीविरुद्धच्या दुसऱ्या ‘एफआयएच’ प्रो लीग लढतीत ३-१ असा शानदार विजय नोंदवला. या विजयासह भारताने गुणतालिकेतील अग्रस्थान कायम राखले आहे.

भारताकडून सुखजीत सिंग (१९व्या मिनिटाला), वरुण कुमार (४१व्या मि.) आणि अभिषेक (५४व्या मि.) यांनी गोल साकारले, तर जर्मनीचा एकमेव गोल अँटन बोइकीलने (४५व्या मि.) केला. गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने जर्मनीचा ३-० असा पराभव केला होता. भारताने १२ सामन्यांत सर्वाधिक २७ गुण कमावले आहे, तर जर्मनीच्या खात्यावर १० सामन्यांतून १७ गुण जमा आहेत. या दोन विजयांसह भारताने प्रो लीगमधील मायदेशातील मोहिमेची विजयी सांगता केली आहे. यापुढे जून महिन्यात भारतीय संघ बेल्जियम आणि नेदरलँड्स संघाविरुद्ध सामने खेळणार आहे.

जर्मनीच्या संघातील २२ खेळाडूंपैकी सहा जणांनी या दोन सामन्यांत पदार्पण केले. त्यामुळे नवोदितांचा भरणा असलेल्या जर्मनीविरुद्ध भारताने वर्चस्वपूर्ण कामगिरी केली.

पहिल्या सत्रात भारताने प्रतिस्पर्ध्याच्या वर्तुळात काही उत्तम आक्रमणे केली; परंतु या संधींचे गोलमध्ये रूपांतरण करण्यात अपयश आले. दुसऱ्या सत्रातील चौथ्या मिनिटाला सुखजीतने मैदानी गोलसह भारताचे खाते उघडले. मनप्रीत सिंग आणि निलकांता शर्मा यांच्या साहाय्यामुळे सुखजीतला कारकीर्दीतील दुसरा गोल साकारता आला. या गोलनंतर भारताने सामन्यावर नियंत्रण मिळवले. दडपणाखाली खेळणाऱ्या जर्मनीचा प्रयत्न क्रिशन बहादूर पाठकने हाणून पाडला. मध्यंतरापर्यंत भारताने तीनदा गोललक्ष्य साधण्याचा प्रयत्न केला, तर जर्मनीच्या वाटय़ाला एकही आला नाही.

तिसऱ्या सत्रात तिसऱ्या मिनिटाला भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला; परंतु जर्मनीचा गोलरक्षक जीन डॅनीबर्गने हरमनप्रीत सिंगचा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही.

४१व्या मिनिटाला शिलानंद लाक्राने आणखी एक पेनल्टी कॉर्नर भारताला मिळवून दिला. या वेळी वरुण कुमारने डाव्या कोपऱ्यातून कोणतीही चूक न करता भारताच्या खात्यावर दुसरा गोल जमा केला. चार मिनिटांनी गोलरक्षक पीआर श्रीजेशच्या चुकीचा फायदा उचलत अँटन बोइकीलने जर्मनीचे खाते उघडले. चौथ्या सत्रात ५४व्या मिनिटाला हरमनप्रीतने दुरून दिलेल्या पासच्या बळावर अभिषेकने भारताला ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. मग अखेरच्या काही मिनिटांत जर्मनीने सामना वाचवण्यासाठी कडवा संघर्ष केला.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fih pro league india beat germany again zws

ताज्या बातम्या