रॉटरडॅम:भारतीय महिला हॉकी संघाने वर्चस्वपूर्ण कामगिरी करत ‘एफआयएच’ प्रो लीग हॉकीमधील दुसऱ्या सामन्यात अमेरिकेवर ४-० अशी मात करत पदार्पणाच्या हंगामातच तिसरे स्थान मिळवले. भारताने पहिल्या लढतीत ४-२ असा विजय नोंदवला होता.

भारताकडून वंदना कटारियाने (३९व्या मिनिटाला, ५४वे मि.) दोन गोल करत निर्णायक भूमिका पार पाडली. तिला सोनिका (५४वे मि.) आणि संगिता कुमारी (५८वे मि.) यांनी गोल करीत उत्तम साथ दिली. अर्जेटिनाने यापूर्वीच लीगचे जेतेपद मिळवले आहे, तर नेदरलँड्सचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. भारताने सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व मिळवत अमेरिकेला पुनरागमन करण्याची कोणतीच संधी दिली नाही.

हॉकी : भारताकडून युक्रेनचा पराभव

डब्लिन : भारताच्या महिला संघाने २३ वर्षांखालील पाच देशांच्या हॉकी स्पर्धेत आपली विजयी लय कायम ठेवत बुधवारी युक्रेनवर ३-० अशा फरकाने विजय मिळवला. भारताकडून निकिता टोप्पो (३३व्या मिनिटाला), मंजू चोरसिया (४४वे मि.), ब्युटी डुंगडुंग (५५वे मि.) यांनी गोल केले. भारताने सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत युक्रेनवर दडपण आणले. युक्रेनकडून गोल करण्याचे प्रयत्न झाले, मात्र भारताच्या बचावफळीने ते हाणून पाडले.