Finn Allen Creates History: गुजरात टायटन्सविरूद्ध सामन्यात ईडन गार्डन्सच्या मैदानावर फिन अ‍ॅलन नावाचं वादळ पाहायला मिळालं. कोलकाता नाईट रायडर्सचा सलामीवीर फिन अ‍ॅलनने गुजरात टायटन्सविरुद्ध वादळी खेळी साकारली. फिनने ईडन गार्डन्सवर षटकारांची आतिषबाजी करत ९३ धावा केल्या, पण अवघ्या काही धावांनी त्याचं शतक हुकलं. फिन अ‍ॅलनने शतक साकारलं नसलं तरी या खेळीदरम्यान त्याने अनेक मोठे विक्रम आपल्या नावे केले. ज्यामध्ये विश्वविक्रमाची नोंद आहे.

फिन अ‍ॅलनने अवघ्या ३५ चेंडूंमध्ये ४ चौकार आणि १० षटकारांसह ९३ धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याने २६५.७१ च्या स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पाडला. यापूर्वी फिन अ‍ॅलनने दिल्लीसाठी शतक झळकावताना १० षटकार मारले होते. यासह, तो आयपीएलमध्ये एका डावात दोनदा १० षटकार मारणारा कोलकाता नाईट रायडर्सचा पहिला खेळाडू ठरला आहे. तसेच, आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो केवळ चौथा खेळाडू आहे.

फिन अ‍ॅलन षटकारांचा नवा बादशाह

फिन अ‍ॅलनने आयपीएलच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा विक्रम आपल्या नावावर केला. एका हंगामात दोन वेळा एका डावात १० षटकार मारणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला. आयपीएलच्या आधीच्या हंगामांमध्ये अनेक फलंदाजांनी एका डावात १० किंवा त्यापेक्षा अधिक षटकार ठोकले आहेत. मात्र, एका हंगामात दोन वेगवेगळ्या डावांत १० पेक्षा अधिक षटकार मारण्याची कामगिरी यापूर्वी कोणालाही करता आली नव्हती.

फिन अ‍ॅलनने ही ऐतिहासिक कामगिरी करत आयपीएलमध्ये नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. दरम्यान, आयपीएलमध्ये एका डावात सर्वाधिक वेळा १० किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. २००९ ते २०२१ दरम्यान आयपीएल खेळताना गेलने तब्बल चार वेळा एका डावात १० पेक्षा अधिक षटकार आपल्या खेळींदरम्यान त्याने खेचले आहेत. मात्र, फिन अ‍ॅलनप्रमाणे एका हंगामात दोनदा ही कामगिरी करण्याचा पराक्रम गेललाही करता आला नव्हता.

ख्रिस गेल आणि फिन अ‍ॅलनव्यतिरिक्त वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा हेही आयपीएलमध्ये एका डावात १० किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारणारे फलंदाज आहेत. या दोघांनीही दोन वेळा अशी कामगिरी केली आहे. तसेच, गुजरात टायटन्सविरुद्ध आयपीएल सामन्यात १० पेक्षा अधिक षटकार मारणारा फिन अ‍ॅलन हा एकूण तिसरा फलंदाज ठरला आहे. याआधी वैभव सूर्यवंशी आणि विल जॅक्स यांनी ही कामगिरी केली होती.