Finn Allen Creates History: आयपीएल २०२६ च्या ६० व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सलामीवीर फिन एलनने गुजरातविरुद्ध वादळी फटकेबाजी केली. ईडन गार्डन्सच्या मैदानावर होत असलेल्या या सामन्याची नाणेफेक गुजरातने जिंकत केकेआरला फलंदाजीसाठी पाचारण केलं. सलामीला उतरलेल्या फिन एलनने वादळी फलंदाजी करत संघाच्या २४६ धावांच्या धावसंख्येत ९३ धावांचं योगदान दिलं. एलनचं शतक हुकलं असलं तरी त्याने मोठा विक्रम मात्र आपल्या नावे केला आहे.
फिन एलनने ३५ चेंडूंमध्ये १० षटकार आणि ४ चौकारांसह ९३ धावांची वादळी खेळी केली. या वादळी खेळीदरम्यान त्याचा स्ट्राईक रेट २६५.७१ होता आणि त्याने गुजरातच्या सर्वच गोलंदाजांची चांगलीच शाळा घेतली. फिनने आपल्या खेळीत १० षटकार मारून, अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी यांच्या विक्रमाची बरोबरी केली.
फिनने या हंगामातील गुजरातविरुद्धच्या ६०व्या सामन्यात आपल्या खेळीत १० षटकार मारले. लीगमध्ये दुसऱ्यांदा त्याने एका डावात १० किंवा त्याहून अधिक षटकार मारले आहेत. आता, फिनने आयपीएलच्या एका डावात १० किंवा त्याहून अधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा यांची बरोबरी केली आहे.
फिनच्या आधी, या दोघांनीही या आयपीएलमध्ये दोनदा हा पराक्रम केला आहे. याचा अर्थ, आयपीएलच्या एका डावात सर्वाधिक वेळा १० किंवा त्याहून अधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत फिन आता वैभव आणि अभिषेकसोबत दुसऱ्या स्थानावर बरोबरीत आहे. हा पराक्रम चार वेळा करून ख्रिस गेल या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.
आयपीएलच्या एका डावात सर्वाधिक वेळा १० किंवा त्याहून अधिक षटकार मारणारे फलंदाज
ख्रिस गेल – ४ वेळा
अभिषेक शर्मा – २ वेळा
वैभव सूर्यवंशी – २ वेळा
फिन एलन – २ वेळा
फिन एलनने केकेआरसाठी आयपीएलच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा स्वतःच्याच विक्रमाची बरोबरी केली. त्याने गुजरातविरुद्धच्या आपल्या डावात १० षटकार खेचले, तर या हंगामाच्या सुरुवातीला त्याने दिल्लीत झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या आपल्या डावातही १० षटकार मारले होते.
आयपीएलमध्ये एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम २००८ मध्ये केकेआरकडून खेळणाऱ्या ब्रेंडन मॅककुलमने केला होता, त्याने एकूण १३ षटकार मारले होते. मॅककुलमचा विक्रम अजूनही अबाधित आहे. या यादीत आंद्रे रसेल दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्याने एका डावात ११ षटकार मारले होते, हा विक्रम त्याने २०१८ मध्ये सीएसकेविरुद्ध केला होता.
आयपीएलच्या एका डावात केकेआरच्या फलंदाजांनी मारलेले सर्वाधिक षटकार
१३ षटकार – ब्रेंडन मॅककुलम विरुद्ध आरसीबी, बंगळूरु, २००८
११ षटकार – आंद्रे रसेल विरुद्ध सीएसके, चेन्नई, २०१८
१० षटकार – फिन ॲलन विरुद्ध डीसी, दिल्ली, २०२६
१० षटकार – फिन ॲलन विरुद्ध जीटी, कोलकाता, २०२६.
