Finn Allen Creates World Record in SA vs NZ Semi Final: न्यूझीलंड संघाने दक्षिण आफ्रिका संघावर ९ विकेट्सने एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली आहे. यासह टी-२० विश्वचषक २०२६ चा पहिला फायनलिस्ट संघ निश्चित झाला आहे. न्यूझीलंड संघाच्या विजयाचा हिरो ठरला फिन एलन. सलामीवीर फिन एलनने अखेरच्या चेंडूवर शतक झळकावत वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.
फिन एलनने या सामन्यात टीम सेफर्टसह सलामीला उतरला होता. फिन एलन व टीम सेफर्ट यांनी ५५ चेंडूत ११७ धावांची मॅचविनिंग भागीदारी रचली आहे. फिनने फक्त ३३ चेंडूत १० चौकार व ८ षटकारांसह आणि ३०३.०३ च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी करत शतक झळकावलं. फिन एलन व टीम सेफर्टने वादळी सुरूवात करून देत संघाच्या विजयाचा पाया रचला. सेफर्ट बाद झाल्यानंतर एलनने एका टोकाकडून संघाचा डाव त्याच वेगाने पुढे घेऊन जात राहिला. कोणताही गोलंदाज येऊदे पट्ट्यात चेंडू आला की तो सीमारेषेबाहेर पाठवायचा, या मानसिकतेने तो खेळत होता. संघाला विजयासाठी ७ धावांची गरज असताना त्याने षटकार खेचला. या शतकासह तो ९६ धावांवर पोहोचला, आता त्याला शतकी खेळी पूर्ण करण्यासाठी ४ धावांची गरज होती, तर शतकासाठी ४ धावा हव्या होत्या. यासह त्याने पुढच्या चेंडूवर चौकार खेचत आपलं शतक पूर्ण केलं आणि संघालाही ऐटीत विजय मिळवून दिला.
फिन एलनने सेमीफायनलमध्ये झळकावलं विश्वविक्रमी शतक
फिन एलनने सेमीफायनल सामन्यात शतक झळकावत मोठी कामगिरी केलीच. पण फिन एलनने टी-२० विश्वचषक इतिहासात सर्वात जलद शतक झळकावण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. त्याच्या आधी ख्रिस गेलने २०१६ मध्ये ४७ चेंडूत वानखेडेच्या मैदानावर शतक झळकावलं होतं. आता फिन एलनने त्याला मागे टाकत हा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.
सामन्यानंतर सादरीकरण समारंभात ही खेळी त्याच्या सर्वोत्तम डावांपैकी एक आहे का, असं विचारलं असता एलन म्हणाला, “हो, नक्कीच ही खेळी पहिल्या क्रमांकावर ठेवावी लागेल. मी चांगल्या पोझिशनमध्ये जाऊन चेंडूला फटका मारण्यावर लक्ष केंद्रित केलं. सुरुवातीपासूनच प्रतिस्पर्ध्यांना दबावाखाली टाकायचं होतं. सेफर्टने ज्या पद्धतीने सुरुवात केली, त्यामुळे मलाही गती मिळाली. आम्हाला थेट फटकेबाजी करायची होती आणि आम्ही दोघांनी तो आनंद लुटला.”
एलनने टी-२० विश्वचषकापूर्वी भारत दौऱ्याचाही उल्लेख केला. “खेळपट्टीशी जुळवून घेणं महत्त्वाचं असतं. सराव खूप गरजेचा असतो. विश्वचषकापूर्वी आम्ही भारतात काळ्या मातीच्या खेळपट्ट्यांवर बरेच सामने खेळले, त्यामुळे परिस्थितीची चांगली माहिती मिळाली. आता रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्याकडे आम्ही उत्सुकतेने पाहतो आहोत,” असे एलन म्हणाला.
