मुंबईमध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) माध्यम हक्कांच्या विक्रीसाठी गेल्या तीन दिवसांपासून लिलाव प्रक्रिया सुरू आहे. या लिलावाच्या दुसऱ्या दिवशी आयपीएलच्या टीव्ही आणि डिजिटल प्रसारणासाठी विक्रमी किंमत मिळाल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आयपीएलचे माजी अध्यक्ष असलेल्या ललित मोदींचे एक ट्विट चर्चेत आले आहे.

आयपीएलसाठी ललित मोदींचे आभार मानले पाहिजेत असे ट्विट, एका ट्विटर वापरकर्त्याने केले होते. त्याला उत्तर देताना ललित मोदी म्हणाले की, त्यांनी १५ वर्षांपूर्वी लावलेल्या झाडाची फळे आता बीसीसीआय खात आहे. ललित मोदींनी असा दावा केला की, बीसीसीआयने समालोचकांना त्यांचे नाव घेण्यासही बंदी घातली आहे. ही मोठी लीग सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावूनही आपले नाव घेतले जात नसले तरी त्याचा फारसा फरक पडत नाही, असे मोदी म्हणाले.

हेही वाचा – IND vs IRE: आयर्लंड दौऱ्यावर ‘स्पेशल’ व्यक्तीच्या हाती असणार भारतीय संघाची जबाबदारी

ललित मोदींनी ट्विट केले की, “त्यांनी समालोचन करतानाही माझे नाव घेण्यास बंदी घातली आहे. त्यांनी आयपीएलच्या उभारणीत काहीही भूमिका निभावली नसल्यामुळे त्यांना भीती वाटते. मला याचा काहीही फरक पडत नाही. हे संकुचित मनाचे लोक आहेत. त्यांची मानसिकता वाईट आहे. पण, यामुळे मी आयपीएलची उभारणी केली हे तथ्य बदलणार नाही. माझ्यासाठी हेच पुरेसे आहे.”

दरम्यान, आयपीएलच्या माध्यम हक्कांसाठी कोट्यवधी रुपयांची बोली लागली आहे. स्टार स्पोर्ट्सने २३ हजार ५७५ कोटी रुपयांना टीव्ही प्रसारणाचे हक्क आणि आणि व्हायाकॉम १८ने २० हजार ५०० कोटी रुपयांना डिजिटल प्रसारणाचे हक्क मिळवले असल्याचे वृत्त आहे. मात्र, बीसीसीआयने अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.