माऊंट मांघनाई इथे सुरू असलेल्या कसोटीत न्यूझीलंडचे सलामीवीर डेव्हॉन कॉनवे आणि टॉम लॅथम यांनी एक अद्भुत विक्रम नावावर केला. कसोटी क्रिकेटच्या १४८ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच संघाच्या दोन्ही सलामीवीरांनी दोन्ही डावात शतक झळकावण्याचा विक्रम नावावर केला.

फलंदाजांसाठी पोषक खेळपट्टीवर न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. कॉनवे-लॅथम जोडीने ३२३ धावांची खणखणीत सलामी दिली. कॉनवेने ३१ चौकारांसह २२७ धावांची मॅरेथॉन खेळी साकारली तर कर्णधार लॅथमने १५ चौकार आणि एका षटकारासह १३७ धावांची खेळी केली. या दोघांच्या दिमाखदार खेळाच्या बळावर न्यूझीलंडने ५७५ धावांवर पहिला डाव घोषित केला. धावांसाठी झगडणाऱ्या कॉनवेने एकाच सामन्यात दोन शतकी खेळी साकारत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या आयपीएल ऑक्शनमध्ये कॉनवेला संघात समाविष्ट करण्यात कोणत्याही संघाने स्वारस्य दाखवलं नाही.

वेस्ट इंडिजने केव्हिज हॉजच्या शतकाच्या जोरावर ४२० धावांची मजल मारली. न्यूझीलंडतर्फे जेकब डफीने ४ तर एजाज पटेलने ३ धावा पटकावल्या.

कॉनवे-लॅथम जोडीने दुसऱ्या डावातही धावांची टांकसाळ उघडत वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. या जोडीने १९२ धावांची सलामी दिली. कॉनवेने द्विशतकापाठोपाठ आणखी एक शतक झळकावण्याचा विक्रम नावावर केला. त्याने ८ चौकार आणि ३ षटकारांसह १०० धावांची खेळी केली. लॅथमने पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही शतक झळकावलं आणि या जोडीच्या नावावर अनोखा विक्रम नोंदला गेला. लॅथमने १०१ धावांची खेळी केली. न्यूझीलंडने दुसरा डाव ३०६ धावांवर घोषित केला आणि वेस्ट इंडिजसमोर ४६२ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.

न्यूझीलंड मालिका २-० जिंकण्यासाठी प्रयत्नशील आहे. न्यूझीलंडने टी२० मालिका ३-१ तर वनडे मालिका ३-० अशी जिंकली आहे.