टी२० वर्ल्डकपचा श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील सामना वाईड न दिल्यामुळे चर्चेत आहे. सामना जिंकण्यासाठी श्रीलंकेला शेवटच्या षटकात २८ धावा करायच्या होत्या. शेवटच्या दोन चेंडूवर ६ धावा असं समीकरण आलं होतं. मात्र पाचवा आणि सहावा चेंडू वाईड देण्यात आला नाही.
पाकिस्तानने श्रीलंकेला २१३ धावांचं प्रचंड लक्ष्य दिलं होतं. याचा पाठलाग करताना शेवटच्या षटकात श्रीलंकेला २८ धावांची आवश्यकता होती. कर्णधार दासून शनकाने चौकार आणि सलग तीन षटकार चोपत विजयाच्या आशा जिवंत राखल्या. पहिल्या चेंडूवर शनाकाने लगावलेला फटका चुकला पण चेंडू सीमारेषेपल्याड गेला. दुसरा चेंडू शनाकाने कव्हर क्षेत्रात भिरकावला. तिसरा चेंडू शनाकाने मिडविकेट पटट्यात पिटाळला. चौथ्या चेंडूवर शनाकाने कव्हर्सच्या डोक्यावरून उत्तुंग षटकार लगावला. सलग तीन षटकारांमुळे आव्हान सोपं झालं.
पाचव्या चेंडूवर शनाकाचा रिव्हर्स स्कूप करण्याचा प्रयत्न फसला. शाहीन शहा आफ्रिदीने वाईड यॉर्कर टाकला होता. वाईड देण्यात आला नाही. हा चेंडू निर्धाव पडल्याने श्रीलंकेला शेवटच्या चेंडूवर षटकाराची आवश्यकता होती. शाहीन शहा आफ्रिदीने टाकलेला चेंडू ऑफस्टंपपासून खूप बाहेर असल्याने पंच वाईड देतील या आशेने शनाकाने सोडून दिला. परंतु पंचांनी वाईडचा इशारा केला नाही. तो चेंडू वैध राहिला आणि श्रीलंकेच्या पदरी पराभव आला.
सामना संपताक्षणी सोशल मीडियावर पंचांनी पाकिस्तानला जिंकून दिलं असे मेसेज फिरू लागले. सहावा चेंडू वाईडच्या रेषेच्या बाहेर असतानाही पंचांनी दिला नाही. पंचांनी हा चेंडू वाईड दिला असता तर श्रीलंकेला एक अतिरिक्त चेंडू मिळाला असता तसंच एक धावही कमी झाली असती. मात्र तसं झालं नाही.
या षटकासाठी ऑस्ट्रेलियाचे अनुभवी पंच रॉड टकर कर्तव्यावर होते. वाईड देण्यात न आल्याने पाकिस्तानचा विजय सुकर झाला. खेळाडूंनी हस्तांदोलन केलं. श्रीलंकेचे प्रशिक्षक आणि माजी कर्णधार सनथ जयसूर्या यांनी सामना संपल्यानंतर पंच टकर यांच्याशी चर्चा केली.
न्यूझीलंडविरुद्ध पराभवासह श्रीलंकेचं वर्ल्डकपमधलं आव्हान आधीच संपुष्टात आलं होतं. मात्र या लढतीत विजयासह चाहत्यांची मनं जिंकायचा त्यांचा प्रयत्न होता. दासून शनकाने ३१ चेंडूत २ चौकार आणि ८ षटकारांसह नाबाद ७६ धावांची अफलातून खेळी साकारली. पवन रत्नायकेने ३७ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ५८ धावांची शानदार खेळी केली होती. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ३३ चेंडूत ६१ धावांची केलेली भागीदारी महत्त्वपूर्ण ठरली. रत्नायके बाद झाल्यानंतर शनाकाने दुनिथ वेल्लागेसह सातव्या विकेटसह १५ चेंडूत ४५ धावांची भागीदारी केली.
