नवी दिल्ली : ‘भारतीय फुटबॉलचा आवाज’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ क्रीडा समालोचक, पत्रकार आणि दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक नोव्ही कपाडिया यांचे गुरुवारी प्रदीर्घ आजारपणामुळे निधन झाल़े  ते ६७ वर्षांचे होते.

कपाडिया हे गेली काही वर्षे मज्जाससंस्थेशी संबंधित विकाराने आजारी होते. त्यामुळे गेली दोन वर्षे ते व्हिलचेअर वापरायचे. गेल्या महिन्याभरापासून ते कृत्रिम श्वसनयंत्रणेवर होते. काही महिन्यांपूर्वी कपाडिया यांच्या निवृत्तिवेतनाच्या समस्येमुळे माजी क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्या प्रयत्नांमुळे त्यांना चार लाख रुपयांची मदत केली होती.

कपाडिया यांनी ‘बेअरफूट टू बूट्स, दी मेनी लिव्हज ऑफ इंडियन फुटबॉल’ यांच्यासारख्या फुटबॉलवरील अनेक पुस्तकांचे लेखन केले आह़े  २०१४ मध्ये त्यांचे ‘दी फुटबॉल फॅनॅटिक्स इसेन्शियल गाइड बुक’ हे पुस्तक प्रकाशित झाले होते. फुटबॉलशिवाय कपाडिया यांनी आशियाई, राष्ट्रकुल आणि ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाचे समालोचन केले होते. याशिवाय त्यांनी नऊ ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धाचे वृत्तांकन केल़े  याशिवाय, एसजीटीबी खालसा महाविद्यालयात कपाडिया हे प्राध्यापक होत़े  २००३ ते २०१० या कालखंडात त्यांनी दिल्ली विद्यापीठाचे प्रतिष्ठेचे पदही भूषवले होते.