नवी दिल्ली : या वर्षाच्या सुरुवातीला, कोका कोलाच्या अधिकृत प्रायोजकत्वाखाली फुटबॉल विश्वचषकाने भारताचा प्रवास केला. मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात चषकाचे भारतात स्वागत झाले. तेव्हा एका क्षणासाठी भारत आणि फुटबॉल यांचे नाते दृढ असल्याचे जाणवले. मात्र, या प्रवासानंतर या स्पर्धेचे प्रक्षेपण हक्क विकत घेण्याची इच्छा असणाऱ्या प्रक्षेपण कंपन्या गायब झाल्या. आता स्पर्धेची उलटगणती सुरू झालेली असताना सामन्यांचे जगभरातील थेट प्रसारण निश्चित होऊनही भारताला अजून याबाबत प्रतीक्षाच आहे.
आशियातील थेट प्रसारणासाठी ‘फिफा’ने जपान, इंडोनेशिया, सिंगापूर आणि हाँगकाँगसह आशियातील इतर देशांशी करार पूर्ण केले आहेत. मात्र, प्रमुख फुटबॉल बाजारपेठ म्हणून भारताचा उल्लेख केल्यानंतरही अद्याप स्पर्धेच्या भारतातील थेट प्रसारणासाठी कुठलाही करार झालेला नाही. उत्तर अमेरिकेतील १६ शहरांमध्ये ही स्पर्धा सुरू व्हायला आता फक्त ९० दिवस उरले आहेत.
यापूर्वी भारताकडे विश्वचषकासाठी एक निश्चित ‘ब्रॉडकास्ट होम’ होते. सन २००२ मध्ये ‘टेन स्पोर्ट्स’ने, २०१० मध्ये ‘ईएसपीएन-स्टार’ने, तर २०१४ आणि २०१८ मध्ये ‘सोनी’ने याचे प्रक्षेपण केले होते. २०२२ मध्ये ‘वायकॉम १८’कडे हे हक्क होते (टीव्हीवर स्पोर्ट्स १८ आणि डिजिटलवर जिओ सिनेमा). मात्र, या वेळी अजून कुणीच पुढे आलेले नाही.
‘फिफा’ने २०२६ आणि २०३० च्या विश्वचषकासाठी एकत्र आणि २०२७ च्या महिला विश्वचषकासाठी स्वतंत्र निविदा जुलै २०२५ मध्ये काढल्या होत्या. अर्ज करण्याची अंतिम मुदत २ सप्टेंबर २०२५ उलटून गेली आहे. मात्र, भारतासाठी हे हक्क अद्याप विकले गेलेले नाहीत.
अडचण कुठे?
भारतीय बाजारपेठ सभासद वर्गणीवर नाही, तर जाहिरातींवर चालणारी आहे. प्रसारण माध्यमातील एका माजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने सांगितले की, फुटबॉलमध्ये क्रिकेटसारखे विराम नसतात. क्रिकेटमध्ये प्रत्येक षटकानंतर विराम मिळतो, फुटबॉलमध्ये जाहिराती दाखवण्याची संधीच नसते. त्यातच मध्यंतराच्या वेळी बहुतेक प्रेक्षक टीव्ही बंद करतात किंवा चॅनेल बदलतात.
या वेळेस स्पर्धेतील सामन्यांची संख्या ६४ वरून १०४ झाली असली, तरीही जागतिक स्तरावर फुटबॉल विश्वचषकाचा जाहिरात बाजार २०१८ मधील १२.६ अब्ज डॉलर्सवरून २०२६ मध्ये १०.५ अब्ज डॉलर्सपर्यंत घसरण्याचा अंदाज आहे. मनोरंजन क्षेत्रातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या वेळी हक्कांची किंमत सुमारे १०० दशलक्ष डॉलर्स होती. भारत विश्वचषक खेळत नाही आणि प्रेक्षकसंख्या फक्त उपांत्य फेरी, तसेच अंतिम फेरी अशा तीन-चार सामन्यांपुरती मर्यादित असते. इतक्या कमी सामन्यांसाठी मोठी रक्कम कोण देणार?
क्रिकेटचा प्रभाव
भारतात क्रिकेटचा प्रभाव इतका प्रचंड आहे, की इतर खेळांना जागा मिळणे कठीण होते. यंदा आयपीएल मार्च ते मेदरम्यान असेल आणि त्यानंतर लगेच जूनमध्ये विश्वचषक फुटबॉल स्पर्धा सुरू होईल. बहुतेक जाहिरातदारांनी ‘आयपीएल’साठी आधीच खर्चाचे नियोजन केले असणार, यात शंका नाही. त्यामुळे लगेच मोठ्या प्रमाणावर जाहिरीतीवर खर्च करण्यासाठी कुणी तयार होईल का, अशी वेगळी शंका उपस्थित केली जात आहे.
सामन्यांच्या वेळेची अडचण
या वेळी २०२६ मधील विश्वचषक स्पर्धा उत्तर अमेरिकेत होत असल्याने सामन्यांच्या वेळा भारतीय प्रेक्षकांसाठी गैरसोयीच्या आहेत. स्पर्धेतील १०४ पैकी ८७ टक्के सामने भारतीय वेळेनुसार रात्री १० नंतर सुरू होतील.
दूरदर्शनचा पर्याय
स्पोर्ट्स ब्रॉडकास्टिंग सिग्नल्स ॲक्टनुसार, राष्ट्रीय महत्त्वाच्या स्पर्धांचे सिग्नल दूरदर्शनबरोबर शेअर करणे बंधनकारक असते. त्यामुळे भारतीय चाहत्यांना किमान उपांत्य आणि अंतिम सामने दूरदर्शनवर विनामूल्य पाहता येतील. पण, ही तात्पुरती सोय आहे, व्यावसायिक धोरण नाही. यूट्यूबचा या क्षेत्रात प्रवेश, ही मात्र एक महत्त्वाची बाब आहे, जी भारतासाठी कदाचित इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त महत्त्वाची ठरू शकेल.
