‘रिअल माद्रिद’च्या प्रशिक्षकपदी झिनेदिन झिदानची वापसी

‘रिअल माद्रिद’ला पुन्हा एकदा सर्वोच्च स्थानी पोहोचवण्याचा निर्धार झिदान यांनी व्यक्त केला आहे.

Zinedine Zidane
सोमवारी ‘रिअल माद्रिद’ने प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा झिनेदिन झिदान यांची नियुक्ती करत असल्याचे जाहीर केले. 

फुटबॉल जगतातील अत्यंत नावाजलेल्या ‘रिअल माद्रिद’ या क्लबच्या प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा झिनेदिन झिदान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अवघ्या 10 महिन्यांपूर्वीच झिदान यांना संघाच्या सुमार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षकपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

‘रिअल माद्रिद’ हा फुटबॉल क्लब १९०२ साली सुरु झाला असून या फुटबॉल क्लबमध्ये गेल्या वर्षभरापासून प्रशिक्षकपदावरुन संभ्रमावस्था दिसून आली होती. कोपा डेल रे, चॅम्पियन्स ट्रॉफी, ला लिगा यासारख्या नामांकीत स्पर्धांमध्ये ‘रिअल माद्रिद’ला अपेक्षित कामगीरी करता आली नव्हती. त्यामुळे गेल्या वर्षी मे महिन्यात झिनेदिन झिदानला प्रशिक्षकपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर प्रशिक्षकपदी नियुक्ती झालेल्या ज्युलेन लोपेतेगुई यांची देखील ऑक्टोबर महिन्यात अवघ्या १३९ दिवसांत प्रशिक्षकपदावरुन  उचलबांगडी झाली. त्यांच्या जागी सँतियागो सोलारी यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, सोलारी यांची कारकिर्द देखील पाच महिन्यांमध्येच संपुष्टात आली. त्यामुळे आता प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

अखेर सोमवारी ‘रिअल माद्रिद’ने प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा झिनेदिन झिदान यांची नियुक्ती करत असल्याचे जाहीर केले. ‘रिअल माद्रिद’ला पुन्हा एकदा सर्वोच्च स्थानी पोहोचवण्याचा निर्धार झिदान यांनी व्यक्त केला आहे. मी स्वगृही परतल्याचा आनंद आहेच. मी प्रशिक्षकपदाची धूरा सांभाळण्यासाठी सज्ज असून कोचिंग स्टाफ आणि सहाय्यक प्रशिक्षक हे पूर्वीचेच असतील, असे त्याने स्पष्ट केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Football zinedine zidane back as coach of real madrid