नवी दिल्ली : करोना विषाणूच्या संसर्गामुळे ईशान्य भारतातील मिझोरामसारख्या राज्यांमध्ये रक्ताची कमतरता जाणवू लागली आहे. या परिस्थितीमध्ये रक्ताची गरज भागविण्यासाठी आता भारतीय फुटबॉल संघाचा आघाडीवीर जेजे लाप्लेख्लुआ याने पुढाकार घेतला आहे.

देशात सध्या दोन आठवडय़ांच्या टाळेबंदीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र करोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढू लागल्यामुळे टाळेबंदीत दोन आठवडय़ांची वाढ होण्याची दाट शक्यता आहे. अनेक राज्यांमध्ये टाळेबंदीचा कालावधी वाढवल्यामुळे देशात रक्ताची कमतरता जाणवू लागली आहे.

‘‘टाळेबंदीमुळे रक्तपेढय़ा सहजासहजी उपलब्ध नाहीत. त्यामुळे यंग मिझो असोसिएशनशी संलग्न असलेल्या अनेक रुग्णालयांनी रक्ताच्या मदतीची अपेक्षा आहे. ही बातमी माझ्यापर्यंत पोहोचल्यानंतर आपल्या परीने काय करता येईल, याचा विचार करू लागलो. कठीण परिस्थितीत हातावर हात ठेवून बसणे शक्य नव्हते. त्यानंतर ३३ जणांचे पथक घेऊन आम्ही यंग मिझो असोसिएशनच्या डर्टलँग येथील शाखेत दाखल झालो. ३३ पैकी २७ जणांनी रक्तदान केले. या कठीण परिस्थितीत सर्वानी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे,’’ असे जेजे याने सांगितले.

मिझोराम आणि ईशान्येकडील अन्य राज्यांमध्ये रक्तसंकलन करणारी यंग मिझो असोसिएशनही सर्वात मोठी बिगरसरकारी स्वयंसेवी संस्था आहे. ‘‘रक्तदान करून एक छोटीशी भूमिका पार पाडल्याचे समाधान वाटत आहे. मला हे सामर्थ्य दिल्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. रुग्णालयांना यापुढे रक्ताची गरज भासल्यास आम्ही मदत करण्यासाठी तयार आहोत. याक्षणी घरात राहणे जितके गरजेचे आहे, तितकेच लोकांच्या दैनंदिन गरजा भागविण्याची आवश्यकता आहे,’’ असे जेजे याने सांगितले.