मोसमा अखेरीस सहावे स्थान पटकावण्याकडे फोर्स इंडियाचे लक्ष

सहारा फोर्स इंडिया संघाने रविवारी होणाऱ्या फॉम्र्युला-वन मोसमातील अखेरच्या ब्राझिलियन ग्रां. प्रि. शर्यतीआधी हार मानलेली नाही.

सहारा फोर्स इंडिया संघाने रविवारी होणाऱ्या फॉम्र्युला-वन मोसमातील अखेरच्या ब्राझिलियन ग्रां. प्रि. शर्यतीआधी हार मानलेली नाही. सांघिक अजिंक्यपद (कंस्ट्रक्टर्स चॅम्पियनशिप) शर्यतीत सहावे स्थान पटकावून मोसमाची सांगता करण्याकडे फोर्स इंडिया संघाचे लक्ष लागले आहे.
मॅकलॅरेन संघाने १०२ गुणांसह पाचवे स्थान प्राप्त केले आहे. सौबेर संघ ५३ गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे ७७ गुणांसह सहाव्या स्थानी असलेल्या फोर्स इंडियाकडे २४ गुणांची आघाडी आहे. ‘‘आमच्या सहाव्या स्थानाला धक्का लागणार नाही. मात्र आम्हाला निर्धास्त राहून चालणार नाही. अखेरच्या शर्यतीतही चांगली कामगिरी करण्याकडे आमचे लक्ष लागले आहे,’’ असे संघाचे सहमालक विजय मल्ल्या यांनी सांगितले.
फोर्स इंडियाचा ड्रायव्हर पॉल डी रेस्टा म्हणाला, ‘‘४.३०९ किलोमीटरच्या या छोटय़ाशा सर्किटवर ड्रायव्हर्सची कसोटी लागणार आहे. प्रत्येक सेकंद आमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. लॅपदरम्यान येणाऱ्या वळणांमध्ये विविधता आहे. त्यामुळे कारवर अचूक नियंत्रण ठेवावे लागणार आहे. फोर्स इंडिया संघासाठी चांगला निकाल देण्याकरिता मी प्रयत्नशील असणार आहे.’’ हा ट्रॅक माझ्या कारसाठी पोषक असून मी चांगली कामगिरी करेन, असा विश्वास दुसरा ड्रायव्हर एड्रियन सुटीलने व्यक्त केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Force india target to captured sixth place at the end of formula one season