मुंबई : शुभमन गिलमध्ये विराट कोहलीइतकी क्षमता असून भविष्यात तो भारतीय फलंदाजीचा तारणहार ठरेल, अशा शब्दांत भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाणने युवा सलामीवीराचे कौतुक केले.
गिलने गेल्या काही काळात क्रिकेटच्या तीनही प्रकारांत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात द्विशतक (२०८) आणि अखेरच्या ट्वेन्टी-२० सामन्यात शतक (नाबाद १२६) झळकावले होते. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत शतक साकारणारा गिल भारताचा केवळ पाचवा फलंदाज आहे. आगामी काळात तो दर्जेदार कामगिरी सुरू ठेवेल याची पठाणला खात्री आहे.
‘‘गिल सध्या उत्कृष्ट फलंदाजी करतो आहे. मी त्याचा चाहता आहे. भविष्यात तो क्रिकेटच्या तीनही प्रकारांत भारताचा प्रमुख फलंदाज म्हणून पुढे येईल असा मला विश्वास आहे. कोहलीने अनेक वर्षे जागतिक क्रिकेटवर वर्चस्व गाजवले. गिलमध्येही कोहलीइतकीच क्षमता आहे. मात्र, त्याने क्षमतेनुसार कामगिरी करत राहणे गरजेचे आहे. त्याने आतापर्यंत चांगले संकेत दिले आहेत,’’ असे पठाण म्हणाला.
‘‘गिल खूप प्रतिभावान खेळाडू आहे. त्याने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील पहिले शतक केले होते. त्यानंतर पाच महिन्यांत त्याने एकूण सहा शतके झळकावली आहेत. प्रतिभेचे कामगिरीत रूपांतरण करण्यात आपण सक्षम असल्याचे गिलने सिद्ध केले आहे,’’ असेही पठाणने सांगितले. गिलने आतापर्यंत कसोटी आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये प्रत्येकी एक, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये चार शतके केली आहेत.
कसोटीत रोहित-राहुल योग्य
भविष्यात गिल क्रिकेटच्या तीनही प्रकारांत भारताचा प्रमुख फलंदाज म्हणून पुढे येईल याची खात्री असली, तरी तूर्तास कसोटी संघात सातत्याने संधी त्याला वाट पाहावी लागेल, असे पठाणला वाटते. ‘‘कसोटी क्रिकेटमध्ये रोहित शर्मा आणि केएल राहुल हे सलामीला योग्य आहेत,’’ असे पठाण म्हणाला.