क्रिकेट खेळामध्ये दोन्ही संघ, पंच आणि मैदानाबरोबर चांगल्या समालोचकालादेखील तितकेच महत्त्व आहे. काही प्रसिद्ध क्रिकेट समालोचकांनी आपल्या आवाजामुळे चाहत्यांच्या मनात कायमची जागा मिळवलेली आहे. अशाच समालोचकांमध्ये ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांचा समावेश आहे. गेल्या ४५ वर्षांपासून चॅपेल समालोचनाचे काम करत होते. आता त्यांनी आपल्या साडेचार दशकांच्या कारकिर्दीचा शेवट करण्याचा निर्णय घेतला आहे. चॅपेल यांनी समालोचनामधून निवृत्ती घेतली आहे.

७८ वर्षीय चॅपेल हे परखड मत मांडण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या माध्यमातून आपल्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. ते म्हणाले, “मला आजही क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचा दिवस आठवत आहे. खेळ बस झाला आता, अशी जाणीव तेव्हा मला झाली होती. मात्र, समालोच सोडण्याचा निर्णय घेताना मला फार विचार करावा लागला. काही वर्षांपूर्वी किरकोळ झटका (स्ट्रोक) आला होता. तेव्हा मी नशीबवान ठरलो. परंतु, आरोग्याच्या समस्यांमुळे आता सर्वकाही कठीण होत आहे.”

इयान चॅपेल यांनी ऑस्ट्रेलियासाठी ७५ कसोटी सामने खेळून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर त्यांनी समालोचन सुरू केले होते. ऑस्ट्रेलियातील क्रिकेट वाहिनी, ‘चॅनल नाईन’साठी रिची बेनॉड, बिल लॉरी आणि टोनी ग्रेग यांच्यासह मिळून चॅपेलने समालोचनाचे काम केले. ‘कसा समालोचक म्हणून लोकांनी तुम्हाला आठवणीत ठेवावे?”, असा प्रश्न विचारला असता चॅपेलने मजेशीर उत्तर दिले. ते म्हणाले, “लोक माझ्याबद्दल काय विचार करतात हे त्यांच्यावर अवलंबून आहे. काहींना वाटेल की मी चांगले काम केले. काहींना वाटेल की अतिशय वाईट होतो. पण, याचा मला थोडाही फरक पडत नाही.”

हेही वाचा – Video: “यांच्यापेक्षा गल्लीतरी पोरं बरी!” इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये संघ व्यवस्थापकांची एकमेकांना मारहाण

इयान चॅपेल यांना त्वचेच्या कर्करोगाचे निदान झाले आहे. याशिवाय, त्यांना आरोग्याच्या समस्या सहन कराव्या लागत आहेत. असे असले तरी, त्यांनी सतत क्रिकेट आणि क्रिकेटच्या बदलत्या स्वरुपाबद्दल परखडपणे आपली मते मांडली होती.