ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डेमियन मार्टिनची प्रकृती सध्या गंभीर असल्याचे वृत्त ऑस्ट्रेलियन माध्यमांनी दिले आहे. मेंदूज्वर (मेनिन्जायटिस) झाल्याने मार्टिनला गोल्ड कोस्ट येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
ऑस्ट्रेलियातील वृत्तपत्रांच्या माहितीनुसार, ५४ वर्षीय मार्टिनला मेंदूज्वर झाल्याने डॉक्टरांनी त्याला कृत्रिम कोमामध्ये ठेवले आहे. “मार्टिनची प्रकृती अजूनही गंभीर असून गोल्ड कोस्ट विद्यापीठ हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर सर्वोत्तम उपचार सुरू आहेत,” असे गोल्ड कोस्ट हेल्थच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
ऑस्ट्रेलिया संघातील माजी सहकारी डॅरेन लिहमन, ॲडम ग्रिलख्रिस्ट यांनी समाजमाध्यमांवर मार्टिनसाठी विशेष संदेश लिहिला. “डेमियनसाठी भरपूर प्रेम आणि प्रार्थना. धीराने लढत राहा,” अशी भावना लिहमन यांनी व्यक्त केली. मार्टिन सहजसुंदर फलंदाजी आणि नेत्रदीपक फटक्यांसाठी ओळखला जायचा. त्याने ६७ कसोटी सामन्यांत ४६.३७ च्या सरासरीने धावा केल्या. यात १३ शतकांचा समावेश होता.
२००६-०७ च्या ॲशेस मालिकेत त्याने अखेरची कसोटी खेळली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने २०८ सामने खेळून ४०.८० च्या सरासरीने धावा केल्या. १९९९ आणि २००३ विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचा तो सदस्य होता. २००३ च्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध त्याने नाबाद ८८ धावांची खेळी केली होती.
