ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकेल स्लेटरला बुधवारी सिडनीमध्ये घरगुती हिंसाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. गेल्या आठवड्यात एका कथित घटनेच्या संदर्भात ५१ वर्षीय स्लेटरला अटक करण्यात आल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. न्यू साउथ वेल्स पोलिसांनी सिडनीच्या नॉर्थ बीचवर एका ५१ वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतल्याची पुष्टी केली.

“मंगळवारी १२ ऑक्टोबर २०२१ रोजी कथितरित्या घडलेल्या घरगुती हिंसाचाराच्या घटनेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, ईस्टर्न उपनगर पोलीस एरिया कमांडशी संबंधित अधिकाऱ्यांनी काल तपास सुरू केला. चौकशी केल्यानंतर, पोलीस आज सकाळी ९:२० च्या सुमारास एका घरात गेले आणि ५१ वर्षीय व्यक्तीशी बोलले. तेव्हापासून त्याला अटक करून पोलीस ठाण्यात नेण्यात आले.”, असे पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे.

मायकेल स्लेटर ऑस्ट्रेलियन कसोटी फलंदाजी क्रमवारीत जवळपास एक दशकापर्यंत अव्वल स्थानावर होता. २००४ मध्ये त्याने निवृत्ती घेतली आणि त्यानंतर पूर्णवेळ क्रिकेट तज्ज्ञ आणि समालोचक बनले. २१ फेब्रुवारी १९७० रोजी न्यू साउथ वेल्स येथे जन्मलेल्या स्लेटरने ऑस्ट्रेलियासाठी ७४ कसोटी सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत ४२.८३ च्या सरासरीने ५ हजार ३१२ धावा केल्या. त्याचबरोबर ४२ एकदिवसीय सामन्यांमध्ये २४.०७ च्या सरासरीने ९८७ धावा केल्या आहेत.

हेही वाचा- T20 WC: रणनीती ठरली..! भारताविरुद्ध पाकिस्तान ‘या’ प्लेईंग इलेव्हनसह उतरणार मैदानात

प्रथम श्रेणी क्रिकेटमधील मायकेल स्लेटरचा विक्रमही उत्कृष्ट आहे. त्याने २१६ सामन्यांमध्ये ४०.८५ च्या सरासरीने १४ हजार ९१२ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर,  स्लेटरने  १३५ लिस्ट ए सामन्यांमध्ये २६.५२ च्या सरासरीने ३ हजार ३९५ धावा केल्या आहेत. स्टेलरने १९९३ मध्ये मँचेस्टरमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले आणि २००१ मध्ये लीड्समध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला. त्याने १९९३ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मेलबर्नमध्ये एकदिवसीय पदार्पण केले आणि १९९७ मध्ये ओव्हल येथे इंग्लंडविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला.