सिडनी : ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू अँड्रय़ू सायमंड्सचे रविवारी वाहन अपघातात निधन झाले. तो ४६ वर्षांचा होता.

गेल्या काही महिन्यांमध्ये निधन पावलेला सायमंड्स हा तिसरा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ठरला. मार्चमध्ये दिग्गज लेग-स्पिनर शेन वॉर्न आणि यष्टीरक्षक-फलंदाज रॉडनी मार्श यांचे निधन झाले होते. आता सायमंड्सच्या निधनामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटला मोठा धक्का बसला आहे. ‘‘ईशान्य ऑस्ट्रेलियातील टाउन्सव्हिल येथून साधारण ५० किमी अंतरावर असणाऱ्या हेव्‍‌र्ही रेंज रस्त्यावर रात्री ११च्या सुमारास सायमंड्सच्या गाडीचा अपघात झाला. आपत्कालीन सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ४६ वर्षीय चालकाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुखापतींमुळे त्याचा मृत्यू झाला,’’ अशी माहिती क्वीन्सलँड पोलिसांकडून देण्यात आली.

सायमंड्सची ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये गणना होते. आक्रमक शैलीतील फलंदाज, ऑफ-स्पिन आणि मध्यमगती गोलंदाज व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशी सायमंड्सची ओळख होती. १९९८ ते २००९ या कालावधीत त्याने २६ कसोटी, १९८ एकदिवसीय आणि १४ ट्वेन्टी-२० सामन्यांत ऑस्ट्रेलियन संघाचे प्रतिनिधित्व केले. तसेच २००३ आणि २००७चा एकदिवसीय विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचा तो प्रमुख सदस्य होता. २००३च्या विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्ध सलामीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाची ४ बाद ८६ अशी स्थिती असताना सायमंड्सने १२५ चेंडूंत १४३ धावांची खेळी केली. ही त्याच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी मानली जाते. भारताविरुद्ध २००८च्या सिडनी कसोटीत त्याने १६२ धावांची खेळी केली होती. या सामन्यादरम्यान झालेल्या ‘मंकीगेट’ प्रकरणामुळे तो आणि भारताचा ऑफ-स्पिनर वादात सापडला होता. पुढे जाऊन या दोघांनी ‘आयपीएल’मध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले. तसेच सायमंड्स डेक्कन चार्जर्सकडूनही खेळला.