आगामी इंडियन प्रीमियर लीगच्या लिलावासाठी (आयपीएल २०२२) साठी खेळाडूंच्या रिटेन्शन पॉलिसीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सध्याच्या आठ फ्रेंचायझींना जास्तीत जास्त चार खेळाडू कायम ठेवण्याची परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. महेंद्रसिंह धोनी, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिस किंवा ड्वेन ब्राव्हो या दोघांना सीएसकेमध्ये आयपीएल २०२२ साठी रिटेन करण्यात आले आहे.

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने त्यांचा कर्णधार एमएस धोनीला कायम ठेवल्याबद्दल ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर ब्रॅड हॉगने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणी सीएसकेने प्रोफेशनली विचार करायला हवा, असे ब्रॅड हॉगने म्हटले आहे. धोनी एक वर्षापेक्षा जास्त काळ खेळला नाही तर त्याला कायम ठेवणे योग्य नसल्याचे हॉगने म्हटले आहे. 

आयपीएल रिटेन्शन यादीची अंतिम मुदत संपत आली आहे आणि म्हणून सर्व फ्रँचायझी त्यांच्या संबंधित खेळाडूंची यादी जाहीर करत आहेत. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, चेन्नई सुपर किंग्जने महेंद्रसिंह धोनीशिवाय ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा यांना रिटेन केले आहे. मोईन अलीलाही आणल्याची चर्चा आहे, तो आला नाही तर सॅम करणला कायम ठेवण्यात येईल.

चेन्नई सुपर किंग्जने महेंद्रसिंह धोनीबद्दल भावनिक विचार करू नये, असे मत ब्रॅड हॉगने मांडले आहे. त्याच्या यूट्यूब चॅनलवरील तो म्हणाला, “एमएस धोनीला किती दिवस खेळायचे आहे? जर तो आणखी एक वर्ष खेळला, तर त्याला निवडणे योग्य होणार नाही. मी त्याला लिलावात जाऊ देईन आणि तिथून पुन्हा त्याला विकत घेईन. हे खूप अवघड आहे पण व्यवसायात असेच होते. फक्त एक वर्ष खेळणार असलेल्या खेळाडूवर तुम्हाला १५ टक्के खर्च करायचा आहे का?”

चेन्नई सुपर किंग्जने कोणते चार खेळाडू कायम ठेवले पाहिजेत हेही ब्रॅड हॉगने सांगितले. सलामीवीर ऋतुराज गायकवाड, अष्टपैलू रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर आणि फाफ डू प्लेसिस यांना कायम ठेवावे, असे तो म्हणाला.