ऑस्ट्रेलियाचे माजी फिरकीपटू अॅशले मॅलेट यांचे वयाच्या ७६व्या वर्षी कर्करोगामुळे निधन झाले. या दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूने शुक्रवारी रात्री अॅडलेडमध्ये अखेरचा श्वास घेतला. मॅलेट यांनी १२ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण ३८ कसोटी आणि ९ एकदिवसीय सामने खेळले. त्यांनी १९६८मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले आणि या संघाविरुद्ध १९८० मध्ये कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळली. त्यांनी कसोटीत २९.८४ च्या सरासरीने १३२ बळी घेतले. त्यांनी एकदा १० विकेट्स, ६ वेळा ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.

मॅलेट यांची गणना जगातील सर्वोत्तम ऑफ-स्पिनर्समध्ये होते. १९७२ मध्ये पाकिस्तानविरुद्ध अॅडलेड कसोटीच्या एका डावात त्यांनी ५९ धावांत ८ बळी घेतले होते. ऑस्ट्रेलियातील कोणत्याही स्पिनरची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. नॅथन लायन (३९९ विकेट), ह्यूज ट्रंबूल (१४१ विकेट) हे त्यांच्या पुढे आहेत. मॅलेट यांचा जन्म सिडनी येथे झाला. पण ते पर्थमध्ये वाढले.

हेही वाचा – VIDEO : ‘‘घरी परतल्यावर तालिबानी…”,पत्रकाराचा प्रश्न ऐकून अफगाणिस्तानचा कप्तान म्हणतो..

अॅशले मॅलेट यांनी १९६९-७०मध्ये भारत दौऱ्यावर चार कसोटी सामन्यांमध्ये २८ विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत ४ कसोटी सामन्यांची मालिका ३-१अशी जिंकली. याशिवाय १९७४-७५च्या ऍशेस मालिकेत त्यांनी १७ विकेट घेतल्या होत्या. मॅलेट यांना त्यांचे सहकारी खेळाडू ‘राउडी’ म्हणत.

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मॅलेट यांनी क्रीडा पत्रकार आणि लेखक म्हणूनही काम केले. त्यांनी महान ऑस्ट्रेलियन फिरकीपटू क्लेरी ग्रिमेट यांचे आत्मचरित्रही लिहिले. मॅलेट यांनी अनेक तरुण फिरकी गोलंदाजांना प्रशिक्षण दिले. त्यांनी श्रीलंकेत फिरकीपटूंसाठी अकादमी स्थापन केली. ते बराच काळ श्रीलंका क्रिकेटचे सल्लागार होते.