रांची : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी सचिव आणि झारखंड क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अमिताभ चौधरी यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते.

चौधरी निवृत्त ‘आयपीएस’ अधिकारी होते. झारखंड पोलीस दलात पोलीस महानिरीक्षक पदापर्यंत जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. चौधरी यांनी ‘बीसीसीआय’चे संयुक्त सचिव म्हणूनही काम पाहिले. २००५च्या झिम्बाब्वे दौऱ्यात ते भारताचे प्रशासकीय व्यवस्थापक होते. या दौऱ्यात माजी कर्णधार सौरव गांगुली आणि तत्कालिक प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांच्यातील वाद चांगलाच गाजला होता. तेव्हा चॅपेल यांनी ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष शरद पवार यांना ई-मेलद्वारे गांगुलीसह संघातील वरिष्ठांना वगळण्याची शिफारस केली होती. ‘बीसीसीआय’च्या सचिवपदाचा चौधरी यांचा कार्यकाळ कठीण होता. या कालखंडात ‘बीसीसीआय’चा कारभार प्रशासकीय समितीच्या हाती होता. या समितीने त्यांना काम करण्यास परवानगी नाकारली होती. विराट कोहली व प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यातील वादाचेही ते साक्षीदार होते.