युवा क्रिकेटपटू अंकित केसरी या वीस वर्षीय क्रिकेटपटूची कारकीर्द सुरू होत असतानाच आकस्मिक निधन झाले. मैदानात झेल घेताना तो एका खेळाडूला धडकला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असली तरी अचानक आलेल्या हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामध्येच अंकितला प्राण गमवावे लागले.

क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालतर्फे (कॅब) आयोजित केलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत भवानीपूर संघाविरुद्ध ईस्ट बंगाल संघाकडून खेळत असतानाच त्याला १७ एप्रिलला दुखापत झाली. सौरव मंडल याच्या गोलंदाजीवर झेल घेण्यासाठी त्याने जोरात धाव घेतली. सौरवनेही झेल घेण्यासाठी धाव घेतली. त्या दोघांची धडक झाली. अंकितच्या डोक्यास दुखापत झाली व त्याच्या तोंडातून रक्त यायला लागल्यामुळे त्याला लगेचच जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तात्पुरते उपचार झाल्यानंतर त्याला नाईटेंगल रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्याच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत होती. मात्र सोमवारी पहाटे त्याला हृदयविकाराचा झटका आला व त्यातच त्याने निधन झाले. कित याने कुचबिहार स्पर्धेत बंगालच्या १९ वर्षांखालील संघाचे नेतृत्व केले होते. त्याची भारताच्या युवा गटाच्या संभाव्य संघातही निवड झाली होती. त्याने सी.के.नायडू स्पर्धेतही भाग घेतला होता. रणजी स्पर्धेच्या संभाव्य संघातही त्याची निवड झाली होती.

 भारताने युवा खेळाडू गमावला – सचिन
अंकितचे निधन ही क्रिकेट क्षेत्रासाठी अतिशय क्लेशकारक घटना आहे. त्याच्या निधनामुळे भारताने उदयोन्मुख युवा खेळाडू गमावला आहे. त्याच्या आकस्मिक निधनामुळे त्याच्या कुटुंबीयांवर जो आघात झाला आहे, त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे, असे भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने सांगितले.