लंडन : लॉर्ड्सवरील भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटीत पत्करलेल्या मानहानीकारक पराभवाच्या शल्य जो रूटच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाचे उर्वरित मालिकेतही खच्चीकरण करील, असे मत माजी कर्णधार अँड्रय़ू स्ट्रॉस यांनी व्यक्त केले आहे.

लॉर्ड्सवर अखेरच्या दिवशी सुस्थितीत असलेला इंग्लंडचा संघ अनपेक्षितपणे कोलमडला आणि भारताने १५१ धावांनी दणदण्ीात विजय नोंदवला. याबाबत स्ट्रॉस म्हणाला, ‘‘लॉर्ड्सवरील सामन्यात इंग्लंडकडून विजयाची अपेक्षा होती. परंतु आघाडीची फळी कोलमडल्यामुळे मधल्या फळीवर दडपण वाढले. भारतीय संघाकडे इंग्लंडचा दुसरा डाव गुंडाळण्यासाठी पुरेशी षटके होती.’’

‘‘पाच सामन्यांच्या मालिकेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचे पारडे जड आहे. इंग्लंड संघाचा भारताने दारुण पराभव केला. तिसऱ्या कसोटीसाठी डॉम सिब्लीच्या जागी ऑली पोपला संधी मिळण्याची आवश्यकता आहे,’’ अशी सूचना स्ट्रॉसने केली.

राहुलची आयसीसीक्रमवारीत आगेकूच

दुबई : लॉर्ड्स येथे झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत दिमाखदार शतक झळकवणारा भारतीय सलामीवीर के. एल. राहुलने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ताज्या क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत १९ स्थानांनी आगेकूच केली आहे. तो आता ३७व्या स्थानावर पोहोचला आहे. गेल्या आठवडय़ात तो ५६व्या स्थानावर होता. भारताचा कर्णधार विराट कोहलीने आपला पाचवा क्रमांक टिकवला आहे. गेल्या आठवडय़ात त्याची एका स्थानाने घसरण झाली होती. सलामीवीर रोहित शर्मा आणि यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत आपापल्या सहाव्या आणि सातव्या क्रमांकांवर कायम आहेत.