नवी दिल्ली : सनथ जयसूर्या, कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने या श्रीलंकेच्या दिग्गज क्रिकेटपटूंनी मायदेशातील सरकारविरोधात आवाज उठवला आहे.

आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेतील सरकारने गेल्या शनिवारी सायंकाळपासून सोमवार सकाळपर्यंत संचारबंदी लागू केली होती. श्रीलंकेत अन्यधान्य, इंधने आणि औषधांच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, श्रीलंकन नागरिक सरकारविरोधात निदर्शने करत आहेत. राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांना त्यांच्या पदावरून हटवण्याच्या मागणीने जोर धरला आहे. श्रीलंकेचा माजी डावखुरा सलामीवीर जयसूर्यानेही रस्त्यावर उतरून सरकारला विरोध दर्शवला.

तसेच सरकारने सतत चूकीचे आर्थिक निर्णय घेतल्यानेच श्रीलंकेत आजवरचे सर्वात भीषण आर्थिक संकट ओढवल्याचे जयवर्धने आणि संगकारा यांनी म्हटले आहे. ‘‘श्रीलंकन नागरिकांसाठी सध्याचा काळ खूप अवघड आहे. त्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे पाहून खूप दु:ख होत आहे. दिवसागणिक हे आर्थिक संकट वाढते आहे. त्यामुळेच आता नागरिक सरकारविरोधात आवाज उठवत आहेत. त्यांना या परिस्थितीवर तोडगा पाहिजे आहे,’’ असे संगकारा म्हणाला. सरकारने आता राजकारण बाजूला ठेऊन लोकांचे म्हणणे ऐकण्याची वेळ आली आहे, असेही संगकाराने नमूद केले.

तसेच संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी ६०० हून अधिक जणांना अटक करण्यात आली. मात्र, सरकारचे हे कृत्य अतिशय निंदनीय असल्याचे जयवर्धनेने म्हटले आहे.