वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने निराशाजनक कामगिरीचे प्रदर्शन केले. मात्र, या सामन्यापर्यंतचा संघाचा प्रवास दमदार होता. अॅडलेड कसोटीत ३६ धावांवर सर्वबाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात भूमीत नमवले. मात्र, माजी क्रिकेटपटू दीप दासगुप्ताने अजिंक्य रहाणेमध्ये झालेल्या बदलाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

दीप दासगुप्ताने एका यूट्यूब वाहिनीवर म्हटले, ”अजिंक्य हा आता आधीसारखा खेळाडू राहिलेला नाही. तो २०१५-१६मध्ये अविश्वसनीय होता. तो मुंबईसाठी खेळणारा खेळाडू होता. वानखेडेवर सकाळी खेळताना खेळपट्टी ओलसर असायची, खेळपट्टी गवताळ होती आणि त्या दिवसात तेथे फलंदाजी करणे एक भयानक स्वप्नासारखे होते. रहाणेने भारताकडून खेळण्यापूर्वी स्थानिक क्रिकेटमध्ये ४०००-५००० पेक्षा जास्त धावा केल्या. प्रामुख्याने त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली.”

हेही वाचा – एका दिवसात ३ सुवर्णपदकं जिंकलेल्या दीपिकाला मिळणार ५० लाखांचं बक्षीस!

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पराभवानंतर भारत आता इंग्लंडविरुद्ध आपल्या मोहिमेला प्रारंभ करणार आहे. या परिस्थितीत भारतीय फलंदाजांना स्विंग गोलंदाजीला सोमोरे जाण्याचे आव्हान आहे. याबाबत दासगुप्ताने फुटवर्कच्या बाबतीत मत दिले. तो म्हणाला, ”जेव्हा तुम्ही भारतामध्ये फलंदाजी करता तेव्हा आपले कौशल्य बदलते. आपण बाहेर स्विंग आणि वेगवान खेळपट्टीला सामोरे जाता. येथे इंग्लंडमध्ये आपल्याला रिव्हर्स स्विंग खेळण्याची आवश्यकता आहे. २०१५-१६मध्ये रहाणेच्या फुटवर्कचे परीक्षण केले, तर तुम्हाला समजेल, की त्याचे फुटवर्क निश्चित नव्हते. पहिल्या २० चेंडूत तो खूपच अस्थिर असतो आणि जेव्हा जेव्हा तो मोठी खेळी खेळतो, तेव्हा त्याला खूप आत्मविश्वास असतो.”

उल्लेखनीय बाब म्हणजे, अजिंक्य रहाणेची कामगिरी परदेशात बरीच चांगली झाली आहे. इंग्लंडमध्येही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.