Javed Miandad On Imran Khan: पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि माजी पंतप्रधान इम्रान खान भ्रष्टाचाराच्या आरोपात दोषी आढळल्यामुळे तुरुंगात आहेत. इम्रान खान २०१८ ते २०२२ दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान होते. त्यानंतर २०२३ मध्ये दोषी आढळून आल्याने त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं. दरम्यान पाकिस्तानचे माजी खेळाडू जावेद मियांदाद (Javed Miandad) यांनी इम्रान खान (Imran Khan) यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं. यासह त्यांना अश्रू अनावर झाले.

एका यूट्यूब चॅनेलवर बोलताना जावेद मियांदाद म्हणाले की, “ते (इम्रान खान) एक प्रामाणिक व्यक्ती आहेत. ते असे मुळीच नाहीत जे भ्रष्टाचारासारखं वाईट काम करतील, असं असतं तर त्यांनी खूप काही केलं असतं. तर तुम्ही त्यांना बाहेर काढलं तर काय होईल? ते कोणाला खाऊन टाकणार आहेत का? की कोणाचं नुकसान करतील. ते सुद्धा कोणाचे तरी सुपुत्र आहेत. मला नेहमी हाच विचार येतो की, सध्या ते काय करत असतील.” (Javed Miandad On Imran Khan)

इस्लामाबादमध्ये इम्रान खान यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतरच जावेद मियांदाद यांनी हे वक्तव्य केलं आहे. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर इम्रान खान यांच्या पक्षाने वैदकीय तपासणीच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी म्हटले की, पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना शिफा इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये हलवण्याची आणि त्यांच्या वैयक्तिक डॉक्टरांसह इतर डॉक्टरांच्या टीमच्या उपस्थितीची परवानगी दिली होती.

इम्रान खान आणि जावेद मियांदाद यांनी पाकिस्तानसाठी १९८० आणि ९० चा काळ गाजवला. १९९१ मध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलमध्ये दोघांनी पाकिस्तानच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. त्यावेळी इम्रान खान आणि जावेद मियांदाद यांनी १३४ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली होती.

आता इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान इम्रान खान यांच्या मुलांची मुलाखत प्रसिद्ध करण्यावरुन चांगलाच वाद रंगला होता. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सामन्यावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली गेली होती.