Bangladesh T20 World Cup Boycott: बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदूवरील अत्याचारामुळे भारत आणि बांगलादेशमध्ये तणावाचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वीच बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजूर रहमानला कोलकाता नाईट राईडर्स संघातून वगळण्यात आले होते. त्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. आता बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारतात होत असलेल्या टी२० वर्ल्डकपमध्ये खेळण्यास नकार दिला आहे. यावर भारताचे माजी क्रिकेटपटू मदन लाल यांनी महत्त्वाचे विधान केले असून यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे म्हटले आहे.

भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणाऱ्या संघाचा भाग असलेल्या मदन लाल यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, “बांगलादेशने टी२० वर्ल्डकपवर बहिष्कार घालावा यासाठी पाकिस्तानने त्यांना उद्युक्त केले असावे. कारण या दोन्ही देशांना भारताला अडचणीत आणायचे आहे.” बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आजच जाहीर केले आहे की, ते त्यांचा संघ भारतात खेळण्यासाठी पाठविणार नाहीत.

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ही स्पर्धा भारत आणि श्रीलंकेत संयुक्तरित्या खेळवली जाणार आहे. भारतात सुरक्षिततेला धोका असल्याचे सांगून बांगलादेशच्या संघाने त्यांचे सामने इतरत्र हलविण्याची मागणी केली होती. मात्र आयसीसीने ही मागणी फेटाळून लावली. त्यानंतर बांगलादेशने वर्ल्डकपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने घेतलेला निर्णय मूर्खतेचा असल्याचे मदन लाल म्हणाले. आयसीसीच्या या स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे बांगलादेशला त्याचे आर्थिक परिणाम भोगावे लागतील, असेही ते म्हणाले.

“मला हा मूर्खपणाचा निर्णय वाटतो. कारण यामुळे भारत काहीही गमावणार नाही. पण बांगलादेशला बरेच काही गमवावे लागेल. व्यावसायिक दृष्टीकोनातून पाहिले तर इतक्या मोठ्या स्पर्धेत भाग न घेतल्याने बांगलादेशचे खूप मोठे नुकसान होणार आहे. मला वाटते पाकिस्तान त्यांना या स्पर्धेत भाग न घेण्यास उद्युक्त करत आहे. त्यांना भारताला कमी लेखायचे आहे”

बांगलादेशच्या संघाचे प्रस्तावित सामने कोलकाता आणि मुंबईत खेळले जाणार होते. मदन लाल म्हणाले, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ही दोन्ही शहरे सुरक्षित आहेत. या बहिष्काराचा भारतावर किंवा त्यांच्या क्रिकेट बोर्डावर कोणताही परिणाम होणार नाही, असेही मदन लाल म्हणाले.

बांगलादेशच्या जागी स्कॉटलंड

बांगलादेश टी२० वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर आता स्कॉटलंडचा संघ त्यांची जागा घेऊ शकतो, अशी चर्चा आहे. बांगलादेशचा समावेश गट क मध्ये वेस्ट इंडिज, इटली, इंग्लंड आणि नेपाळ या संघाबरोबर करण्यात आला होता.