एकीकडे भारताच्या 2011च्या विश्वविजेतेपदाला आज 10 वर्षे पूर्ण झाली. तर, दुसरीकडे याच विश्वविजेत्या संघातील महत्त्वाचा सदस्य असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला करोनाच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे. या घटनेनंतर पाकिस्तानचा महान माजी गोलंदाज वसीम अक्रमने सचिनला क्रिकेट पदार्पणाची आठवण करुन त्याला प्रोत्साहन दिले आहे.

सचिनने रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये विजेत्या इंडिया लेजेंड्स संघाचे नेतृत्व केले. सहा दिवसांपूर्वी सचिनला करोनाचे निदान झाले. सचिन आज रुग्णालयात दाखल होताच जगभरातील चाहत्यांनी तो बरा व्हावा, यासाठी प्रार्थना केली आहे. यात पाकिस्तानचा माजी गोलंदाज वसीम अक्रमनेही त्याच्यासाठी खास संदेश दिला आहे.

अक्रम ट्विटरवर म्हणाला, ”16 वर्षाचा असताना तू जगातील सर्वोत्तम गोलंदाजांचा धैर्याने सामना केलास… मला खात्री आहे की, करोनालाही तू षटकार ठोकशील. लवकर बरा हो मास्टर! 2011च्या विश्वविजेत्या दशकपूर्तीचा आनंद डॉक्टर आणि रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांसह साजरा केला, तर ते खूप चांगले होईल. मला फोटो पाठव.”

 

क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिनने 1989मध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यावेळी तो फक्त 16 वर्षांचा होता. त्याने पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात 15 धावा केल्या. यात दोन चौकारांचा समावेश होता. या सामन्यातील पाकिस्तान संघात वकार युनूस, अब्दुल कादिर आणि वसीम अक्रम हे घातक गोलंदाज होते. सचिनने पदार्पणाच्या मालिकेत आपल्या फलंदाजीच्या कौशल्याने सर्वांना चकित केले.

सचिनची कारकीर्द

200 कसोटी सामने खेळणारा आणि 100 आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारा सचिन जगातील एकमेव फलंदाज आहे. त्याने कसोटी सामन्यात 53.78च्या सरासरीने आणि 51 शतकांसह 15 हजार 921 धावा केल्या. तर 463 एकदिवसीय सामन्यामध्ये 44.83च्या सरासरीने 18 हजार 426 धावा बनवल्या. यामध्ये त्याने 49 शतके आणि 96 अर्धशतकांचा समावेश आहे. सचिनने 2013मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली.