Heather Knight Retirement: भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघांमध्ये लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर एकमेव कसोटी सामन्याचा थरार सुरू आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर पहिल्यांदाच महिलांचा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. दरम्यान हा सामना झाल्यानंतर इंग्लंडची वर्ल्डकपविजेती कर्णधार हिदर नाईटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. लॉर्ड्सच्या मैदानावरील एकमेव कसोटी सामना झाल्यानंतर ती आपल्या १६ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम देणार आहे.

हिदर नाईटला इंग्लंडकडून ३२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान तिला १५ कसोटी, १६० वनडे सामने आणि १४५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान तिने ७९८८ धावा केल्या आहेत. यादरम्यान तिने ६ शतकं झळकावली आहेत.

हिदर नाईट ही इंग्लंडकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारी पहिलीच फलंदाज आहे. तिला इंग्लंडकडून २०१६ ते २०२५ पर्यंत नेतृत्व करण्याची संधी मिळाली. यादरम्यान १९९ सामन्यांमध्ये तिने इंग्लंडचं नेतृत्व केलं. तिच्या नेतृत्वात खेळताना इंग्लंडने १३४ सामन्यांमध्ये विजय मिळवला. तिच्या नेतृत्वात इंग्लंडने अनेक महत्वाच्या सामन्यांमध्ये विजय मिळवला. २०१७ मध्ये हिदर नाईटच्या नेतृत्वाखाली खेळताना इंग्लंडने लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा मान पटकावला होता. हिदर नाईट ही महिला क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. तिने बरेच वर्ष इंग्लंडचं नेतृत्व केलं. गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला होता. या मालिकेतील पराभवानंतर तिने इंग्लंडचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने शेअर केलेल्या प्रेस रिलीजमध्ये हिदर नाईट म्हणाली की, “इंग्लंडकडून क्रिकेट खेळणं ही माझ्यासाठी अभियानाची बाब आहे. मी स्वतःला भाग्यवान समजते की, मला इंग्लंडकडून १६ वर्षे खेळण्याची संधी मिळाली. या संघाकडून आणि खेळापासून दूर जाणं मुळीच सोपं नाही. कारण ड्रेसिंग रूम आणि माझ्या सहकाऱ्यांसोबत घालवलेले प्रत्येक क्षण माझ्या आयुष्यातील खास क्षण आहेत.” भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेला कसोटी सामना हा तिच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना असणार आहे.