ऑस्ट्रेलियात होणाऱ्या अ‍ॅशेस मालिकेसाठी इंग्लंडने १७ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. अ‍ॅशेस मालिकेला ८ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. मात्र निवडलेल्या संघावर इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैननं नाराजी व्यक्त केली आहे. “इंग्लंडनं कमीत कमी दोन नव्या चेहऱ्यांना संधी दिली पाहीजे होती. कारण बेन स्टोक्स मालिकेत खेळणार नाही. या मालिकेसाठी साकिब महमूद आणि मॅट पार्किंसनला संधी मिळायला हवी होती”, असं मत नासिर हुसैननं व्यक्त केलं आहे. साकिब महमूद आपल्या रिव्हर्स स्विंगने समोरच्या संघाला अडचणीत आणू शकतो, असंही नासिर हुसैननं पुढे सांगितलं आहे.

“इंग्लंडने अ‍ॅशेस मालिकेसाठी हवा तसा संघ निवडला नाही. निवडकर्त्यांनी कोणतीही जोखीम घेतलेली दिसत नाही. नव्या खेळाडूंना संधी देण्याचं टाळलं. माझ्यासाठी दोन निर्णय आश्चर्याचा धक्का देणारे होते. साकीब महमूद आणि मॅक पार्किंसनना यांना संघात स्थान न दिल्याचं आश्चर्य वाटतं. ऑस्ट्रेलियात साकिब आपल्या रिव्हर्स स्विंगने समोरच्या संघाला अडचणीत आणू शकला असता. जोफ्रा आर्चर आणि ऑली स्टोनच्या जागेवर त्याने चांगली कामगिरी केली असती.”, असं नासिर हुसैन यांनी सांगितलं. “डोम बेसऐवजी मी संघात पार्किसनला संधी दिली असती. कर्णधार म्हणून मी रिस्ट स्पिनरला मैदानात खेळण्याची संधी दिली असती. पार्किसन नाही तर मी मेसन क्रेनला निवडलं असतं”, असंही हुसैन पुढे म्हणाला.

अ‍ॅशेस मालिकेसाठी इंग्लंड संघ
जो रूट (कर्णधार), जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, डोम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, जोस बटलर, जॅक क्राउले, हसीब हमीद, डॅन लॉरेंस, जॅक लीच, डेविड मलान, क्रेग ओवरटन, ओली पॉप, ओली रॉबिनसन्स, ख्रिस वोक्स, मार्क वूड