भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या एजबस्टन कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय कर्णधार जसप्रित बुमराहने धमाकेदार कामगिरी केली. या दिवसाच्या पहिल्या सत्रात त्याने फलंदाजी करताना तुफान फटकेबाजी केली. त्याने स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात ३५ धावा फटकावल्या. शिवाय गोलंदाजी करतानाही तीन बळी मिळवले. त्याच्या या कामगिरीवर भारताचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर आनंदी आहेत. त्यांनी बुमराहला सर्वात चांगला विद्यार्थी म्हटले आहे.

सोनी नेटवर्कच्या क्रीडा वाहिनीवरील ‘एक्स्ट्रा इनिंग्ज’ या कार्यक्रमध्ये बोलताना आर श्रीधर यांनी बुमराहचे कौतुक केले. हर्षा भोगले आणि संजय मांजरेकर यांच्यासोबत चर्चा करताना आर श्रीधर म्हणाले, “तो सर्वात चांगला विद्यार्थी आहे. जेव्हा महेंद्रसिंह धोनी ड्रेसिंग रूममध्ये किंवा मैदानावर काही सूचना देत असे, तेव्हा जसप्रीत बुमराह सर्व गोष्टी कान देऊन ऐकत असे. प्रशिक्षकांच्या सल्ल्याबाबतही तो हेच करत असे. माझ्या कार्यकाळात मी बघितलेल्या खेळाडूंपैकी तो सर्वात चांगला विद्यार्थी आहे.”

हेही वाचा – VIDEO : सासुरवाडीमध्ये दादागिरी करणाऱ्या सुर्याची पत्नीने केली कानउघडणी

एजबस्टन कसोटीतील दुसऱ्या दिवशी भारताच्या डावातील ८४वे षटक स्टुअर्ट ब्रॉड फेकत होता. या षटकामध्ये भारतीय कर्णधार जसप्रित बुमराहने ब्रॉडच्या जुन्या जखमेवरील खपली काढण्याचे काम केले. बुमराहने ब्रॉडच्या एका षटकामध्ये ४, ५, ७, ४, ४, ४, ६, १ अशी फटकेबाजी करत तब्बल ३५ धावा फटकावल्या. अशी कामगिरी करून बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला.