India vs England 2nd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीसाठी जसप्रीत बुमराहला प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. वर्कलोड मॅनेजमेंटचा हवाला देत त्याला प्लेइंग ११ मधून बाहेर ठेवण्यात आलं आहे. बुमराहला प्लेइंग ११ मधून बाहेर ठेवल्याने अनेक दिग्गज खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे. सात दिवसांची विश्रांती मिळाल्यानंतर त्याला बाहेर बसवण्याचा निर्णय घेणं मुळीच योग्य नसल्याचं माजी भारतीय मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे.
जसप्रीत बुमराहला या सामन्यातून विश्रांती दिल्यानंतर रवी शास्त्री म्हणाले,”हा सामना अतिशय महत्वाचा आहे. बुमराहला एका आठवड्याची विश्रांती देण्यात आली आहे, हे कळताच मला आश्चर्याचा धक्का बसला. कोण खेळणार, कोण बाहेर बसणार हा निर्णय खेळाडूने नव्हे तर मुख्य प्रशिक्षक आणि कर्णधाराने घ्यायला हवा. हा मालिकेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा सामना आहे. लॉर्ड्स नंतर, पण या सामन्यातून तु्म्ही प्रत्युत्तर द्यायला हवं.”
प्लेइंग ११ मध्ये ३ मोठे बदल
इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात ३ मोठे बदल करण्यात आले आहेत. या सामन्यासाठी इंग्लंडने आपल्या प्लेइंग ११ मध्ये एकही बदल केलेला नाही. तर भारतीय संघाकडून जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर आणि साई सुदर्शन यांना प्लेइंग ११ मधून बाहेर करण्यात आलं आहे. या तिघांच्या जागी आकाश दीप, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संधी देण्यात आली आहे.
जसप्रीत बुमराहबाबत बोलताना शुबमन गिल काय म्हणाला?
“आम्हालाही नाणेफेक जिंकून गोलंदाजी करायची होती. या सामन्यासाठी प्लेइंग ११ मध्ये ३ बदल करण्यात आले आहेत. रेड्डी, वॉशिंग्टन आणि आकाश दीपला प्लेइंग ११ मध्ये समावेश करण्यात आला आहे. बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. त्याचा कामाचा ताण सांभाळण्यासाठी (वर्कलोड ) त्याला विश्रांती देण्यात आली आहे. तिसरा सामना लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या मैदानावर गोलंदाजांना चांगली मदत मिळते. या सामन्यात बुमराह खेळताना दिसेल. ” हा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचं असल्याचं गिलने सांगितलं.