FIH Hockey World Cup 2026 Indian Hockey Jersey Change: येत्या ऑगस्ट महिन्यात नेदरलँड्स आणि बेल्जियममध्ये FIH हॉकी वर्ल्डकप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेची सुरुवात १५ ऑगस्टपासून होणार आहे. या वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघ पारंपारिक निळ्या रंगाच्या जर्सीऐवजी केशरी रंगाची जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. या निर्णयानंतर सोशल मीडियावरून चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान भारताचे माजी कर्णधार विरेन रास्किन्हा यांनी देखील पोस्ट शेअर करुन प्रश्न उपस्थित केला आहे.
हॉकी इंडियाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून भारतीय हॉकी संघाच्या नव्या जर्सीचे फोटो शेअर केले आहेत. यासह कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, ही जर्सीची डिजाईन आणि जर्सीचा रंग कथा सांगण्यासाठी आणि भारताचा अभिमान दर्शवण्यासाठी आहेत. हॉकी इंडियाने पुढे म्हटले की, भगवा रंग शौर्य, त्याग आणि विजयाचे प्रतीक आहे. तसेच उगवत्या सूर्यापासून प्रेरित असलेली आणि भारतीय राष्ट्रध्वज असलेली ही जर्सी नव्या सुरुवातीचे प्रतिनिधित्व करते. पण भारताचे माजी कर्णधार विरेन रास्किन्हा यांनी यावर प्रश्न उपस्थित केला आहे.
माजी कर्णधार विरेन रास्किन्हा यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत लिहिले की, “हॉकी इंडियाने आतापर्यंत अनेक चांगली कामं केली आहेत. पण हे लाजिरवाणं आहे. भारतीय संघाची ओळख निळ्या रंगाने होते. मी अनेक वर्ष अभिमानाने निळ्या रंगाची जर्सी परिधान केली आहे. चाहत्यांनाही भारतीय संघाला निळ्या रंगाच्या जर्सीत पाहायचं आहे. केशरी रंगामागचं लॉजिक काय?”
हॉकी इंडियाने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. हॉकी इंडियातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “यात काहीच राजकारण नाही. केशरी रंगाची जर्सी असण्यात चुकीचं काय आहे? आपल्या तिरंग्यातही केशरी रंग आहे. शिवाय, बदलाचे नेहमी स्वागत असते.”
यासह त्यांनी निळ्या रंगाची का नको, यामागचं कारणही सांगितलं आहे. ते म्हणाले, “केशरी रंगाची जर्सी परिधान केल्याने कॉन्ट्रास्ट कमी होतो. त्यामुळे खेळाडू निळ्या रंगाच्या मैदानावर स्पष्टपणे दिसून येतात. निळ्या रंगाच्या मैदानावर निळ्या रंगाची जर्सी परिधान केल्याने चाहत्यांना खेळाडूंवर नजर ठेवणं कठीण होतं.”
