आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सने मुंबईला 6 गड्यांनी मात दिली. यात दिल्लीचा फिरकीपटू अमित मिश्राने 4 बळी घेत मुंबईच्या डावाला सुरुंग लावला. या कामगिरीनंतर भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने अमित मिश्राविषयी एक आठवण सांगितली आहे.

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात अमित मिश्राने 4 महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. त्याला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले. क्रिकबझवरील संभाषणादरम्यान वीरेंद्र सेहवाग म्हणाला, ”तो खूप शांत आणि विनम्र माणूस आहे. सर्वांशी तो अत्यंत सभ्यपणे बोलतो. सर्वांमध्ये सहज मिसळत असल्याने तो संघाच्या आवडीचा खेळाडू झाला आहे. जेव्हा त्याच्याविरुद्ध धावा होतात, तेव्हा सर्वांना दु:ख होते.”

”तो जेव्हा यशस्वी होतो, तेव्हा सर्वांना आनंद होतो. मला आठवते, की त्याने जेव्हा आयपीएलमध्ये पहिली हॅट्ट्रिक घेतली होती, तेव्हा मी त्याला काय हवंय म्हणून विचारले होते. तेव्हा त्याने वीरूभाई माझा पगार वाढवा, असे म्हटले होते. आता मला वाटते, की त्याला तेवढे मानधन मिळत असेल”, असे सेहवागने सांगितले.

असा रंगला सामना…

फिरकीपटू अमित मिश्राने केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सवर 6 गडी राखून विजय मिळवला. चेन्नईच्या चेपॉक मैदानावर रंगलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सचे स्टार फलंदाज मोठी कामगिरी करण्यात अपयशी ठरले. फिरकीला मदत करणाऱ्या या खेळपट्टीवर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने 20 षटकात 9 बाद 137 धावा उभारल्या. रोहितव्यतिरिक्त (44) मुंबईच्या इतर फलंदाजांनी निराशा केली. आज दिल्ली संघात संधी मिळालेल्या अनुभवी अमित मिश्राने 4 षटकात 24 धावा देत 4 बळी घेतले. मुंबईच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने केवळ 4 गडी गमावले. मिश्राला सामनावीर पुरस्कार मिळाला. तब्बल 10 वर्षानंतर दिल्लीने या मैदानावर विजय साकारला आहे. याआधी 2010मध्ये त्यावेळच्या दिल्ली डेअरडेव्हिल्सने चेन्नई सुपर किंग्जला चेन्नईत 6 गड्यांनीच मात दिली होती.