भारताचा महान कर्णधार आणि आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करणाऱ्या महेंद्रसिंह धोनीबाबत मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट ट्विटरने धक्कादायक निर्णय घेतला आहे. ट्विटरने धोनीच्या ट्विटर अकाऊंटवरून वेरिफाईड बॅच म्हणजे ‘ब्लू टिक’ (अकाऊंट विश्वसनीय असल्याचे सांगणारे निळ्या रंगाचे चिन्ह) हटवली आहे. ट्विटरने घेतलेल्या या निर्णयापाठचे नेमके कारण कळू शकले नाही.

धोनीला भारतातील सर्वात प्रसिद्ध क्रीडा नायकांपैकी एक मानले जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीनंतरही धोनीच्या लोकप्रियतेत कमी झालेली नाही. धोनी सोशल मीडियावर जास्त अॅक्टिव्ह नसतो, त्यात तो ट्विटर फार कमी दिसतो. ८ जानेवारीला धोनीने शेवटचे ट्वीट केले होते. अनेकवेळा तो फक्त त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करतो.

 

देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर हॅण्डलवरील ‘ब्लू टिक’वरून जून महिन्यात बराच गोंधळ उडाला होता. ट्विटरने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या वैयक्तिक अकाऊंटवरील ‘ब्लू टिक’ काढून टाकली होती. मात्र, याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर ‘ब्लू टिक’ पुन्हा देण्यात आली.

हेही वाचा – IND vs ENG 1st TEST : तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात, राहुल-पंतवर भारताची मदार

‘ब्लू टिक’ का दिली जाते?

खात्रीशीर, विश्वसनीय आणि सक्रिय असलेल्या ट्विटर खात्याबद्दल इतर वापरकर्त्यांना आश्वस्त करण्यासाठी ट्विटरकडून ‘ब्लू टिक’ अर्थात ब्लू व्हेरीफाईड बॅच दिला जातो. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या वैयक्तिक ट्विटर खात्यालाही ‘ब्लू टिक’ देण्यात आली आहे. मात्र, ही ब्लू टिक ट्विटरकडून हटवण्यात आली असल्याचे निदर्शनास आले होते. यावरून बरीच चर्चाही रंगली. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या अकाऊंटवरील ‘ब्लू टिक’ हटवण्यात आल्याने सरकारने आणि भाजपाने नाराजी व्यक्त केली होती. यावरून ट्विटरवर टीकाही सुरू झाली. त्यानंतर ही बाब निदर्शनास आल्यानंतर ट्विटरने पुन्हा ‘ब्लू टिक’ दिली आहे. आता धोनीबाबतही तीच गोष्ट घडणार का, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.