Sanjay Bangar Playing 11 Prediction: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना येत्या २० जूनपासून हेडिंग्लेच्या मैदानावर रंगणार आहे. हा दौऱ्यासाठी बीसीसीआयने १८ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. मात्र पहिल्या सामन्यात कोणत्या ११ खेळाडूंना संधी मिळणार, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान भारताचे माजी क्रिकेटपटू आणि माजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी पहिल्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग ११ निवडली आहे.
संजय बांगर यांनी निवडलेल्या प्लेइंग ११ मध्ये अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर यांना स्थान देण्यात आलेलं नाही. स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी पहिल्या सामन्यासाठी प्लेइंग ११ निवडली आहे. प्लेइंग ११ सांगताना संजय बांगर म्हणाले, ” माझ्या संघात यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, अभिमन्यू ईश्वरन , शुबमन गिल, ऋषभ पंत, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव आणि ३ वेगवान गोलंदाज म्हणून प्रसिद्ध कृष्णा , जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश असेल.”
संजय बांगर यांनी या सामन्यासाठी रविंद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूरला संधी दिलेली नाही. त्यांनी नितीश कुमार रेड्डीचा प्लेइंग ११ मध्ये समावेश केला आहे.
नितीश कुमार रेड्डीबद्दल बोलताना ते म्हणाले, ” मी नितीशकडे एक फलंदाज म्हणून पाहतो, जो गोलंदाजी करू शकतो. त्याला मी असा गोलंदाज समजत नाही जो फलंदाजी करू शकतो. त्यामुळे तो माझ्या संघात शार्दुलपेक्षा पुढे आहे.” नितीश कुमार रेड्डीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर प्लेइंग ११ संधी दिली गेली होती. या संधीचा फायदा घेत, त्याने दमदार कामगिरी केली होती. ज्यावेळी संघातील इतर फलंदाज फ्लॉप ठरत होते. त्यावेळी नितीश कुमार रेड्डी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर भारी पडत होता. त्याची ही कामगिरी पाहून त्याचा इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी असा आहे भारतीय संघ :
शुबमन गिल ( कर्णधार) यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत ( यष्टीरक्षक/ उपकर्णधार), केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रविंद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदिप सिंग, आकाश दीप, कुलदीप यादव