Amit Mishra On Varun Chakravarthy: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करून लागोपाठ दुसऱ्यांदा टी-२ वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान पटकावला. या स्पर्धेत भारतीय फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. संजू सॅमसनने स्पर्धेतील शेवटच्या तिन्ही सामन्यांमध्ये लागोपाठ ३ अर्धशतकं झळकावली. गोलंदाजीत मिस्ट्री गोलंदाज वरूण चक्रवर्तीने विकेट्स घेतल्या. पण तो खूप महागडा ठरला. भारताचा माजी फिरकीपटू अमित मिश्राने वरूण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर मोठं वक्तव्य केलं आहे. अमित मिश्राच्या मते, वरूण चक्रवर्तीने या स्पर्धेत चुकीची गोलंदाजी केली.
अमित मिश्रा काय म्हणाला?
वरूण चक्रवर्तीच्या गोलंदाजीबाबत बोलताना अमित मिश्रा म्हणाला, “त्याने आपल्या गोलंदाजीतील गती वाढवली आहे. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीतील जो मजबूत पक्ष होता, तो कुठेतरी कमी झाला. गेल्या आयपीएलमध्ये त्याच्या गोलंदाजीत कमी गतीने टाकलेला चेंडू, टॉप स्पीन, गुगली आणि लेग स्पीन अशी विविधता पाहायला मिळाली होती. पण टी-२० वर्ल्डकपमध्ये जेव्हा फलंदाज फटकेबाजी करत होते, त्यावेळी तो दबावात असा कुठलाच चेंडू टाकत नव्हता.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “अशावेळी अशा एका व्यक्तीची गरज असते, जो येऊन समजवेल. अंमलबजावणी महत्त्वाची आहे हे सर्वांनाच ठाऊक असते, म्हणूनच मी म्हणतो की आपल्या ताकदीवर ठाम राहा. टी-२० मध्ये गोलंदाजी करण्याचा साधा अर्थ असा आहे की, जेव्हा तुम्हाला खेळपट्टीमधून मदत मिळत असते, तेव्हा तुम्हाला स्वत:हून फार काही करण्याची गरज नसते.” वरूण चक्रवर्ती हा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नंबर १ गोलंदाज आहे. पण अमित मिश्राने त्याला त्याची चूक दाखवून दिली आहे. अमित मिश्राच्या मते, जर त्याने आपल्या गोलंदाजी स्टाईलमध्ये बदल केला नसता, तर त्याला अपेक्षित निकाल मिळू शकला असता.
वरूण चक्रवर्ती इंग्लंडविरूद्ध झालेल्या सेमी फायनलमध्ये महागडा ठरला होता. तरीदेखील सू्र्यकुमार यादवने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि त्याला न्यूझीलंडविरूद्धच्या फायनलमध्ये खेळण्याची संधी दिली होती. फायनलमध्ये त्याने महत्वाचा विकेट मिळवून दिला होता. त्याने या स्पर्धेतील ९ सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना ९ सामन्यांमध्ये एकूण १४ गडी बाद केले. तो या स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराहसह संयुक्तरित्या अव्वल स्थानी राहिला
