नुकतेच रणजी करंडकातील उपांत्यपूर्व सामने पार पडले. उपांत्य फेरीत पोहचलेल्या चार संघांपैकी मुंबईचा विजय ऐतिहासिक ठरला. रणजी करंडकाच्या तिसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात मुंबईच्या संघाने उत्तराखंडचा ७२५ धावांच्या विशाल फरकाने पराभव केला. द्विशतकवीर सुवेद पारकर आणि शतकवीर सर्फराज खान हे मुंबईच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार ठरले. रणजी करंडकांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या सर्फराज खानने माजी भारतीय खेळाडूंचे लक्ष वेधून घेतले आहे. आता माजी दिग्गज भारतीय खेळाडू दिलीप वेंगसरकर यांनी सर्फराचे तोंडभरून कौतुक केले आहे. त्यांच्या मते, सर्फराजला भारतीय संघात स्थान मिळाले पाहिजे.

दिलीप वेंगसरकर हे १९८३मधील विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा भाग होते. याशिवाय, त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये (बीसीसीआय) मुख्य निवडकर्ता म्हणूनही काम केलेले आहे. दिलीप यांच्या मते, सर्फराज खानला भारतीय संघात संधी दिली गेली पाहिजे. वेंगसरकर यांनी खलीज टाईम्सला सांगितले की, “सर्फराज सध्या भारताकडून खेळायला हवा होता. त्याने प्रत्येक वेळी रणजी करंडक स्पर्धेमध्ये भरपूर धावा केल्या आहेत. तरीही निवडकर्त्यांनी त्याच्यावर विश्वास दाखवला नाही, याचे मला आश्चर्य वाटते.”

“भारतीय संघात येण्यासाठी त्याने आणखी काय केले पाहिजे? दरवर्षी, त्याने मुंबईसाठी ८०० हून अधिक धावा केल्या आहेत. त्याच्याकडे मोठ्या खेळी करण्याचे कौशल आहे. तो १२ वर्षांचा असल्यापासून मी त्याला खेळताना बघितले आहे. तो स्ट्रीट-स्मार्ट क्रिकेटर असून नेहमी यशाचा भुकेला दिसतो. शिवाय, तो तंदुरुस्तही असतो,” असे वेंगसरकर म्हणाले.

हेही वाचा – प्रति सामना प्रसारण शुल्काच्याबाबतीत ईपीएलपेक्षा आयपीएल ठरले सरस

ते असेही म्हणाले की, ‘सर्फराज भारतीयसंघातील मधल्या फळीला मोठी चालना देईल. कारण तो धावफलक हालता ठेवू शकतो. धावफलक हालता ठेवण्यासाठी सध्या भारतीय संघाला कोणाची तरी गरज आहे. त्याच्यासारखा फलंदाज यासाठी उत्तम निवड ठरू शकतो’.

मुंबईचा फलंदाज सर्फराज खान यंदाच्या रणजी करंडकामध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने या वर्षीच्या रणजी करंडक स्पर्धेतील शेवटच्या तीन साखळी सामन्यांमध्ये १६५, ६३, ४८ अशा केल्या होत्या. शिवाय, मुंबई विरुद्ध उत्तराखंडविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यातही त्याने १५४ धावा केल्या होत्या. गेल्या रणजी हंगामात त्याने एकूण ९२८ धावा केल्या होत्या. प्रत्‍येक प्रथम श्रेणीतील शतकामध्ये १५० पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. त्याच्या या कामगिरीमुळे माजी खेळाडू दिलीप वेंगसरकर फारच प्रभावीत झाले आहेत.