देवेंद्र पांडे, एक्स्प्रेस
नवी दिल्ली : भारताचे माजी क्रिकेटपटू फारूख इंजिनियर यांचे नाव ‘पद्मश्री’ पुरस्काराच्या मानकर्‍यांमध्ये जाहीर होऊन पन्नासहून अधिक वर्षांचा काळ लोटला तरी, त्यांना अद्याप या सन्मानाचा कुठलेही पदक मिळालेले नाही. मी इंग्लंडमध्ये वास्तव्यास असलो, तरी भारतीय आहे. मला या सन्मानाची प्रतीक्षा असून, तो लवकर मिळेल अशा आशा बाळगून आहे, असे ८८ वर्षीय इंजिनियर यांनी सांगितले.

सत्तरच्या दशकात इंजिनियर भारतीय संघातून क्रिकेट खेळत होते, तेव्हा भारत सरकारकडून देशातील चौथ्या सर्वोच्च नागरी पुरस्कारासाठी निवड झाल्याची माहिती आपल्याला मिळाली होती. परंत, त्याला आज ५३ वर्षे झाली, तरी या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती किंवा पदक मिळाले नसल्याचा दावा इंजिनियर यांनी केला आहे. ही घोषणा झाली तेव्हा सर्वांनी माझे अभिनंदन केल्याची आठवणही त्यांनी सांगितली.

‘‘या पुरस्काराची घोषणा झाली, तेव्हा मी इंग्लंडमध्ये खेळत होतो. संघ व्यवस्थापक हेमू अधिकारी यांनी वृत्तपत्रातून ही बातमी आल्याचे सांगत मला पद्मश्री मिळाल्याची माहिती दिली. परंतु, मला या संदर्भात सरकारकडून कधीही पत्रव्यवहार किंवा अधिकृत सूचना मिळाली नाही. तेव्हापासून मी आजही या पुरस्काराची वाट पाहत आहे,’’ असे इंजिनियर यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले.

विशेष म्हणजे पद्म पुरस्कारार्थींची नावे असलेल्या अधिकृत संकेतस्थळावर

( padmaawards. gov. in) १९७३ मधील पुरस्कार विजेत्यांच्या यादीत इंजिनियर यांच्या नावाचा समावेश आहे. परंतु, त्यानंतर नेमके काय घडले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुरस्कार विजेत्यांच्या नावांची घोषणा करणार्‍या गृह मंत्रालयाला या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाचे कोणतेही उत्तर मिळाले नाही.

‘‘त्या काळात वृत्तपत्रे हेच माहितीचे एकमेव माध्यम होते. मी हेमू अधिकारी यांना सांगितले होते की मला भारत सरकारकडून कोणतीही अधिकृत सूचना मिळालेली नाही, त्यावर त्यांनी मला अधिकृत पत्र येईल असे सांगितले होते. मात्र, आजतागायत मला कोणतेही पत्र किंवा माहिती मिळालेली नाही,’’ असे इंजिनियर म्हणाले.

‘बीसीसीआय’ला या प्रकरणाची माहिती मिळताच, त्यांनी येत्या काही आठवड्यांत सरकारला या संदर्भात पत्र लिहिण्याची तयारी दर्शविली आहे.  इंजिनियर यांनी मांडलेली बाजू सरकारसमोर ठळकपणे मांडण्यासाठी ‘बीसीसीआय’ सरकारला पत्र पाठवेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मला नक्की कोणाला पत्र लिहायचे हे माहित नव्हते, त्यामुळे मी इतकी वर्षे फक्त वाट पाहत राहिलो. मला वाटले होते की सरकारकडून कोणीतरी फोन करून मला माहिती देईल. माजी केंद्रीय मंत्री आणि माजी ‘बीसीसीआय’ उपाध्यक्ष अरुण जेटलीजी यांच्या निधनापूर्वी मी त्यांनाही याबद्दल सांगितले होते. आता ५० हून अधिक वर्षे झाली आहेत. मला वाटले की पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहावा, म्हणून अलीकडेच जय शहा यांना पत्र लिहिले. तेव्हा त्यांनी गेल्या महिन्यात मला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे, असे भारतासाठी ४६ कसोटी सामने खेळलेल्या इंजिनियर यांनी सांगितले. ‘‘मी जरी इंग्लंडमध्ये राहत असलो, तरी माझ्या अंत:करणातून मी एक भारतीयच आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तो फ्रेम करून ठेवायला मला नक्कीच आवडेल. मला राष्ट्रपती भवनात आमंत्रित केले जावे, अशी माझी इच्छा आहे. माझ्या पत्नीनेही माझ्यासोबत यावे आणि आम्ही तो पुरस्कार स्वीकारावा, असे मला वाटते. मी आता ८८ वर्षांचा झालो आहे, आशा आहे की मला तो लवकरच मिळेल,’’ असेही त्यांनी पुढे म्हटले.