K Srikkanth On Vaibhav Sooryavanshi: अफगाणिस्तानचा संघ सध्या भारतात आहे. भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिका भारतात असली तरीदेखील मालिकेचे यजमानपद अफगाणिस्तानकडे आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ७ गडी राखून विजयाची नोंद केली होती. या सामन्यात युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला संधी दिली गेली नव्हती. यावरून माजी भारतीय खेळाडू आणि माजी निवडकर्ते के. श्रीकांत यांनी संताप व्यक्त केला आहे.

भारतीय संघाने पहिल्या टी -२० सामन्यात डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनवर सोपवली होती. अभिषेकने तुफान फटकेबाजी केली. पण संजू सॅमसन स्वस्तात माघारी परतला. या सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी दिली गेली नव्हती. १५ वर्षांच्या वैभवने भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील टी-२० मालिकेत मालिकावीर पुरस्कार पटकावला होता. या मालिकेत त्याने १९६.१० च्या स्ट्राईक रेटने १५१ धावा केल्या होत्या.

भारत – झिम्बाब्वे टी -२० मालिकेसह काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेतही वैभव सूर्यवंशीने तुफान फटकेबाजी केली होती. त्यामुळे त्याला अफगाणिस्तानविरुद्धचा टी-२० मालिकेत संधी मिळण्याचा अंदाज होता. पण त्याला बाकावर बसून राहावं लागलं.

के श्रीकांत काय म्हणाले?

के श्रीकांत म्हणाले, “अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी दिली गेली नव्हती, त्यामुळे आम्ही सामना पाहणं सोडून चित्रपट पाहायला सुरुवात केली. माझी पत्नी ओरडली की, वैभव सूर्यवंशीला संधी देण्यात आलेली नाही. गेल्या मालिकेत त्याने मालिकावीर पुरस्कार पटकावला होता.”

तसेच ते पुढे म्हणाले की, “तुम्ही वैभव सूर्यवंशीवर अन्याय करत आहात. कारण जर त्याला पुढचा सामना खेळण्याची संधी मिळाली, तर त्याच्या मनात एकच गोष्ट सुरू असेल, ती म्हणजे या सामन्यात फ्लॉप झालो तर पुन्हा एकदा प्लेईंग ११ मधून बाहेर केलं जाईल.”