Kirti Azad Gets Angry On Team India: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडवर एकतर्फी विजयाची नोंद केली. भारताने तिसऱ्यांदा या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. तर लागोपाठ दुसऱ्यांदा ही ट्रॉफी उंचावली आहे. या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण देशभरात जल्लोष साजरा केला जात आहे. दरम्यान भारताचे माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनी ट्रॉफी हनुमानाच्या मंदिरात नेण्यावरून वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यासह कर्णधार सूर्यकुमार यादव आणि आयसीसीचे प्रमुख जय शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.
भारतीय संघाच्या विजयानंतर कीर्ती आझाद यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, “टीम इंडियाला लाज वाटायला हवी. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा भारताने वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली होती, त्यावेळी भारतीय संघात हिंदू, मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चन धर्माचे लोक होते. आम्ही ती ट्रॉफी आपली धार्मिक जन्मभूमी आणि मातृभूमी भारत- हिंदुस्थानात आणली होती. आता भारतीय संघाची ट्रॉफी मस्जिदमध्ये का नाही? चर्चमध्ये का नाही? गुरूद्वारा का नाही?”
तसेच त्यांनी पुढे लिहिले की, “हा संघ भारताचं प्रतिनिधित्व करतो. सूर्यकुमार यादव किंवा जय शाह यांच्या कुटुंबाचं नाही. सिराज कधी ही ट्रॉफी मशिदीत घेऊन गेला नाही. संजू कधी ही ट्रॉफी चर्चमध्ये घेऊन गेला नाही. संजूने ट्रॉफी जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली. तो या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. ही ट्रॉफी १.४ अब्ज भारतीयांची आहे. कुठल्याही एका धर्माच्या विजयाचा आनंद साजरा करण्याचे हे ठिकाण नाही.”
कीर्ती आझाद यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सोशल मीडियावर हे प्रकरण सध्या तुफान चर्चेत आहे. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी खेळात जातीचं राजकारण नको, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. स्पर्धेतील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना २५५ धावांचा डोंगर उभारला होता. भारताकडून संजू सॅमसनने ८९ धावांची खेळी केली होती. तर अभिषेक शर्मा आणि इशान किशनने दमदार अर्धशतकी खेळी केली. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव १५९ धावांवर आटोपला. यासह भारताने हा सामना ९७ धावांनी आपल्या नावावर केला.
