Kris Srikkanth On Tilak Varma: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या टी-२० मालिकेत भारतीय टी-२० संघाचा उपकर्णधार तिलक वर्माचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. आयर्लंडनंतर इंग्लंड दौऱ्यावरील चारही टी-२० सामन्यांमध्ये तो एकही मॅचविनिंग खेळी करु शकलेला नाही. असं असतानाही त्याला सातत्याने प्लेईंग ११ मध्ये संधी दिली जात आहे. यावरुन भारताचे काही क्रिकेटपटू आणि माजी निवडकर्ते कृष्णमाचारी श्रीकांत यांनी संताप व्यक्त केला आहे. यासह तिलक वर्माला संघाबाहेर करण्याचा सल्ला दिला आहे.

के श्रीकांत यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते म्हणाले, “तुम्ही म्हणता तिलक वर्मा तुमचा प्रमुख फलंदाज आणि उपकर्णधार आहे. मग तुम्ही त्याला वेगवान गोलंदाजांचा सामना करण्यापासून का थांबवता? त्याच्या आधी अक्षर पटेलला पाठवतात. हे तिलक वर्माचा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण यांना माहीत आहे, शॉर्ट पिच गोलंदाजीसमोर तो अडचणीत येतो. मी आधीपासून हेच म्हणतोय, त्याला संघातून बाहेर करा. पण ते तसं करत नाही.”

तसेच ते पुढे म्हणाले की, “तो सध्या उपकर्णधार आहे, असं वाटतंय लवकरच तो संघाचा कर्णधार बनू शकतो. वेगवान आणि उसळी घेणारे चेंडू पाहून तिलक वर्माची फलंदाजीला येण्याची इच्छा होत नसेल. तिलक वर्माचं चाललंय तरी काय?” तिलक वर्माने अनेकदा भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. पण गेल्या काही सामन्यांमध्ये तो नावाला साजेशी कामगिरी करु शकलेला नाही. आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध झालेल्या ६ सामन्यांमध्ये त्याला केवळ १ अर्धशतकी खेळी करता आली आहे. यादरम्यान त्याने १९,५५,१३, २४, ३ आणि ११ धावांची खेळी केली आहे. श्रीकांत यांच्या मते, तिलक वर्माला विश्रांती द्यायला हवी आणि त्याच्या जागी संजू सॅमसनला खालच्या फळीत संधी मिळायला हवी.

भारताचा पराभव

ब्रिस्टलच्या मैदानावर पार पडलेल्या सामन्यात भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना श्रेयस अय्यरला वगळलं, तर इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. श्रेयस अय्यरने नाबाद ८० धावांची खेळी केली. तर शिवम दुबेने २२ धावांचे योगदान दिले. भारतीय संघाने २० षटकांअखेर ७ गडी बाद १५८ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडकडून कर्णधार हॅरी ब्रूकने सर्वाधिक ७९ धावांची खेळी कली आणि फिल सॉल्टने ५९ धावांची खेळी करुन हा सामना ९ गडी राखून खिशात घातला.