Manoj Tiwary On Hardik Pandya Captaincy: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. वानखेडे स्टेडियम हा मुंबईचा गड आहे. त्यामुळे या मैदानावर येऊन मुंबईला हरवणं मुळीच सोपं नव्हतं. पण यावेळी उलट चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईला वानखेडे स्टेडियमवर खेळताना लागोपाठ पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुरुवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना पंजाबसमोर विजयासाठी १९६ धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. हे आव्हान पंजाबने १७ व्या षटकात पूर्ण करून एकतर्फी विजयाची नोंद केली. या दारूण पराभवानंतर हार्दिक पंड्याच्या नेतृत्वावरही जोरदार टीका केली जात आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबई इंडियन्सने ५ वेळा जेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती. त्यानंतर रोहितला काढून ही जबाबदारी हार्दिक पंड्याकडे देण्यात आली. पण हार्दिक हवी तशी कामगिरी करू शकलेला नाही. पंजाब किंग्ज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात हार्दिककडून बऱ्याच चुका झाल्या. यावरून माजी भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारीने हार्दिक पंड्यावर जोरदार टीका केली आहे.
मनोज तिवारी म्हणाला, “२०२३ मध्येही ट्रॉफी नव्हती, २०२४ मध्येही नव्हती आणि यावेळीही असंच काहीसं होण्याची शक्यता आहे. मला तरी वाटतं की, हार्दिक पंड्याचं नेतृत्व कमकुवत आहे. मला फार कठोर व्हायचं नाही, पण हार्दिकने ज्याप्रकारे संघाचं नेतृत्व करायला हवं, तो तसं करत नाहीये. त्याने कर्णधार म्हणून पुढाकार घेणं खूप गरजेचं आहे.”
तसेच रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवण्याबाबत बोलताना मनोज तिवारी म्हणाला, “जर मुंबई इंडियन्सला बदल घडवायचा असेल, तर हार्दिकने कर्णधारपदावरून बाजूला होऊन रोहित शर्माकडे सूत्र सोपवली पाहिजेत. कारण रोहितने या संघाला ५ जेतेपदं मिळवून दिली आहेत.”
मनोज तिवारीने हार्दिक पंड्याच्या फलंदाजीवरूनही जोरदार टीका केली. तो म्हणाला, “पंजाब किंग्जविरुद्ध हार्दिकने स्वतःहून फलंदाजीला यायला नको होतं. त्याने १२ चेंडूत अवघ्या १४ धावा केल्या. शेरफेन रुदरफोर्डला फक्त ५ चेंडू खेळण्याची संधी मिळाली. इतके चेंडू जर रुदरफोर्डला मिळाले असते, त्याने ३-४ षटकार मारले असते. हार्दिक पंड्याला वाटलं की तो हे करू शकतो.”
