Parthiv Patel On Vaibhav Sooryavanshi: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या टी-२० मालिकेत भारतीय संघाकडून सुपरफ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे धुतला गेला होता. पण त्यानंतर झालेल्या पुढील दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. या दोन्ही सामन्यांमध्ये वैभव सूर्यवंशीला प्लेईंग ११ मध्ये स्थान दिलं गेलं होतं. पण तो दोन्ही सामन्यांमध्ये स्वस्तात माघारी परतला. मालिकेत पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाला जर मालिकेत पुनरागमन करायचं असेल, तर चौथा सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. दरम्यान या सामन्याआधी भारताचा माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेलने वैभव सूर्यवंशीला मोलाचा सल्ला दिला आहे.
वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२६ स्पर्धेत दमदार कामगिरी केली होती. या कामगिरीच्या बळावर त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली होती. आयर्लंड दौऱ्यावर त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. इंग्लंड दौऱ्यावरील दुसऱ्या टी-२० सामन्यात त्याने पदार्पण केलं. यादरम्यान त्याने जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार खेचला. त्यानंतर तो स्वस्तात बाद झाला. दुसऱ्या सामन्यातही त्याने जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला. पण जोफ्रा आर्चरने त्याला शॉर्ट चेंडूवर बाद करत माघारी धाडलं.
पार्थिव पटेलचा वैभव सूर्यवंशीला मोलाचा सल्ला
वैभव सूर्यवंशीबाबत बोलताना पार्थिव पटेल म्हणाला की, “फक्त जोफ्रा आर्चरच नाही, तर आयपीएल पाहणाऱ्या कोणालाच हे पाहून आश्चर्य वाटणार नाही की, वैभवविरुद्ध गोलंदाजी करताना जाणूनबुजून शॉर्ट गोलंदाजी रणनीतीचा वापर केला गेला आहे. हा विकेट मिळवून देणारा चेंडू नव्हता. त्याआधी टाकलेला चेंडू देखील शॉर्ट होता. पहिल्या सामन्यात वैभवने ज्या चेंडूवर षटकार खेचला होता, त्या चेंडूला हवा तितका बाऊन्स मिळाला नव्हता. पण लाईन तीच होती.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “जसजशी वैभव सूर्यवंशीची कारकिर्द पुढे जाणार, तसं त्याला १४५ किमी/तास पेक्षा जास्त वेगवान आणि शॉर्ट पिच गोलंदाजीचा सामना करावा लागेल. त्यामुळे, हे पाहणं महत्वाचं ठरेल की,तो अशा शॉर्ट गोलंदाजीचा सामना कसा करतो. कारण प्रत्येक गोलंदाज त्याच्याविरुद्ध याच रणनीतीचा वापर करेल.” वैभवने आयपीएल स्पर्धेत शॉर्ट चेंडू मैदानाबाहेर पोहोचवले होते. पण परदेशात खेळताना मुख्यत: इंग्लंडमध्ये खेळताना चेंडू जास्त बाऊन्स मिळतो. यासह चेंडू वेगाने येतो आणि स्विंग देखील होतो. असं असतानाही वैभव कसा सामना करेल, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
