Team India Playing XI Prediction: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेत भारतीय संघ २-० ने पिछाडीवर आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. या मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने प्लेईंग ११ मध्ये अनेक बदल करुन पाहिले, पण भारतीय संघाला हवं तसं कॉम्बिनेशन मिळू शकलेलं नाही. मालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात संजू सॅमसनला बाहेर करुन वैभव सूर्यवंशीला संधी दिली गेली होती. पण या दोन्ही सामन्यांमध्ये तो हवी तशी कामगिरी करु शकलेला नाही. दरम्यान भारताचा माजी खेळाडू आणि समालोचक पार्थिव पटेलने निवडलेल्या प्लेईंग ११ मध्ये संजू सॅमसनला स्थान देण्यात आलं आहे. तर स्टार अष्टपैलू खेळाडूला संघाबाहेर केलं. कशी आहे पार्थिव पटेलने निवडलेली भारतीय संघाची प्लेईंग ११? जाणून घ्या.

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय फलंदजांचा पूर्णपणे फ्लॉप शो पाहायला मिळाला. भारतीय संघ २०२ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला होता. पण भारताचा डाव अवघ्या ७६ धावांवर आटोपला. यासह इंग्लंडने हा सामना १२५ धावांनी आपल्या नावावर केला आणि मालिकेत २-० ने आघाडी घेतली.

पार्थिव पटेलच्या मते, संजू सॅमसनला प्लेईंग ११ मध्ये स्थान मिळायला हवं. तर शिवम दुबेला प्लेईंग ११ मधून बाहेर करायला हवं. प्लेईंग ११ बाबत बोलताना पार्थिव पटेल म्हणाला, “माझ्या मते, संजू सॅमसन , इशान किशन आणि श्रेयस अय्यरला मधल्या फळीत संधी मिळायला हवी. सामन्याच्या परिस्थितीनुसार त्यांच्या फलंदाजीचा क्रम कोणताही असू शकतो,पण मला हे पाहायला आवडेल. जेव्हा ७ पैकी ६ फलंदाज हे डावखुऱ्या हाताचे फलंदाज असतात, तेव्हा मुळीच सोपं नसतं. गोलंदाजांना एकाच पद्धतीची गोलंदाजी करण्याची सवय होते. त्यामुळे मला तरी हेच वाटतं की, भारतीय संघाने या गोष्टीकडे लक्ष देण्याची खूप गरज आहे.”

तसेच तो पुढे म्हणाला की, “आपल्याकडे जे पर्याय उपलब्ध आहेत, ते पाहता संजू सॅमसनला संघात संधी मिळायलाच हवी. मी तिलक वर्माा सहाव्या क्रमांकावर ठेवेन, कारण तो संघाचा उपकर्णधार आहे. मला वाटतं अशा परिस्थितीत शिवम दुबेला बाहेर बसावं लागेल. त्यामुळे अक्षर पटेल सातव्या क्रमांकावर खेळताना दिसेल. हेच आपले ७ सर्वोत्तम फलंदाज आहेत. त्यामुळे आपण त्यांना पाठिंबा द्यायला हवा. त्यानंतर ५ प्रमुख गोलंदाज आहेत, त्याच्यांवर विश्वास ठेवून त्यांच्याकडून २० षटकं गोलंदाजी करुन घ्यावी लागेल. तर ७ फलंदाजांनाही धावा करण्यासाठी पाठिंबा द्यावा लागेल.”

चौथ्या टी-२० सामन्यासाठी अशी आहे पार्थिव पटेलने निवडलेली भारताची प्लेईंग ११:

अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन, इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, प्रिन्स यादव.