R Ashwin On India vs Pakistan Match: आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेला सुरुवात होण्याआधी एकच मुद्दा चर्चेत आहे, तो म्हणजे भारत – पाकिस्तान सामन्याचा मुद्दा. या स्पर्धेला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना १५ फेब्रुवारीला कोलंबोत होणार आहे. पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या सामन्यावर बहिष्कार टाकला आहे. याचा फटका पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला बसू शकतो. या प्रकरणावर अनेक दिग्गज खेळाडूंनी आपलं मत मांडलं आहे. दरम्यान भारताचा माजी फिरकीपटू आर. अश्विनच्या मते, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आपला निर्णय बदलू शकतो.

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा आमनेसामने येत असतात, तेव्हा क्रिकेट चाहत्यांना हाय व्हॉल्टेज सामना पाहायला मिळत असतो. हा सामना १५ फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे. हा सामना सुरू व्हायला अवघे ११ दिवस शिल्लक आहेत. आर अश्विनला पूर्ण विश्वास आहे की, येत्या ४ ते ५ दिवसात पाकिस्तान आपला निर्णय बदलणार. आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना आर अश्विन म्हणाला की, “भारत- पाकिस्तान सामना १०० टक्के होणार. पाकिस्तान येत्या ४-५ दिवसात आपला निर्णय बदलणार. जर हा सामना रद्द झाला, तर मोठं नुकसान होणार आहे. ब्रॉडकास्टर्सचंही मोठं नुकसान होईल, याचा परिणाम इतर फुल मेंबर्स देशांवर देखील होऊ शकतो. आयसीसीच्या बैठकीत सर्व हेच म्हणणार आहेत की, पाकिस्तानमुळे सर्वांचं नुकसान होणार आहे.”

भारत- पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा आयसीसीला आणखी मोठा फटका बसू शकतो. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेचे आयोजन केले जाते. जर पाकिस्तानने असं काही केलं, तर आयसीसीकडून परदेशी खेळाडूंना मिळणारी NOC रद्द केली जाऊ शकते. असं झाल्यास, पाकिस्तानचे खेळाडू वगळता इतर कुठल्याही खेळाडूंना पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा खेळता येणार नाही. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला दुहेरी धक्का बसू शकतो.

आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचे यजमानपद बीसीसीआयकडे होते. त्यावेळी पाकिस्तानचे खेळाडू भारतात आले होते. त्यानंतर पाकिस्तानात आयोजित करण्यात आलेल्या आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानात जाण्यास नकार दिला होता. तेव्हापासून दोन्ही देशांचे सामने हे न्यूट्रन वेन्यूवर खेळवले जातील, असा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेचे यजमानपद भारताकडे असतानाही पाकिस्तानचे सामने श्रीलंकेत आयोजित करण्यात आले आहेत. याबाबत बोलताना अश्विन म्हणाला, “स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये होणार, हे आधीच ठरलं आहे. आयसीसी, पीसीबी आणि बीसीसीआयने हायब्रिड मॉडेलला होकार दिला आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ न्यूट्रल वेन्यूवर खेळणार आहेत. त्यामुळे वेन्यूचं कारण नको. प्रतिस्पर्धी संघाविरूद्ध खेळण्यास नकार देणं, हे योग्य नाही. मी आशा करतो की, ते पुन्हा विचार करतील आणि सामना खेळवला जाईल.”