R Ashwin On Fan war: भारतीय खेळाडू जगातील सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहेत. त्यामुळे भारतीय खेळाडूंचा चाहतावर्ग हा जगभरात पसरला आहे. भारतीय संघासाठी खेळत असताना क्रिकेट चाहते, संपूर्ण भारतीय संघाला सपोर्ट करतात. पण जेव्हा आयपीएलमध्ये सपोर्ट करण्याची वेळ येते, तेव्हा विराट कोहली, रोहित शर्मा आणि एमएस धोनीचे चाहते यांच्यात फॅन वॉर सुरू असतो. दरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू आर अश्विनने फॅन वॉरवर आपली प्रतिक्रिया दिली असून, विराट कोहलीसोबत झालेल्या मजेशीर संवादाबाबत खुलासा केला आहे.

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात खेळताना भारतीय संघाने १५४ धावांचं आव्हान अवघ्या १० षटकात पूर्ण केलं होतं. या सामन्यानंतर आपल्या यूट्यूब चॅनेलवर विश्लेषण करताना अश्विनने भारतीय फलंदाजीच्या बदलत्या दृष्टिकोनावर भाष्य केले. भारतीय संघ आता रक्षणवादी विचारसरणीतून बाहेर पडून आक्रमक आणि हाय-टेम्पो क्रिकेट कसा खेळत आहे, हे त्याने यावेळी स्पष्ट केले.

या चर्चेदरम्यान आर अश्विनने २०२४ टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम सामन्याचा देखील उल्लेख केला. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने १७६ धावा केल्या होत्या. हा सामना भारतीय संघाने शेवटच्या षटकात ७ धावांनी आपल्या नावावर केला होता. अश्विनने जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचा आणि सूर्यकुमार यादवने घेतलेल्या कॅचचा उल्लेख केला. पण विराटने केलेल्या ७६ धावांचा उल्लेखही केला नाही.

यावरून एक्स अकाऊंटवरून एका यूजरने अश्विनवर असा आरोप केला होता की, अश्विनने विराट कोहलीला जाणूनबुजून दुर्लक्ष केलं आणि त्यावर अप्रत्यक्ष हल्ला केला.यावर अश्विनने आपली प्रतिक्रिया दिली आहे.अश्विनने आपल्या पोस्टमध्ये म्हटले, “मी नुकतंच विराटशी या ‘अप्रत्यक्ष हल्ल्या’बद्दल बोललो आणि आम्ही दोघेही यावर मनसोक्त हसलो. सोशल मीडियावर अशा ‘क्लिक-बेटी’ फॅन वॉर कशा प्रकारे चालतात, यावर आम्ही चर्चा केली. आम्हाला एकमेकांशी बोलायला आणि बाँडिंग करायला एक नवीन कारण दिल्याबद्दल तुझे आभार.” यावरून अश्विनने हे दाखवून दिलं की, मैदानाबाहेर भारतीय खेळाडूंमध्ये खूप चांगले संबंध आहेत. मात्र, सोशल मीडियावर चाहते विनाकारण त्याच्यांमध्ये मतभेद असल्याचा आभास निर्माण करतात.