R Ashwin Shared Sunny Leone Photo: भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मात्र तो सोशल मीडियावर तुफान चर्चेत असतो. खेळाडूंच्या कामगिरीचं कौतुक किंवा एखाद्या मुद्द्यावर आपलं मत मांडण्यासाठी तो पोस्ट शेअर करत असतो. यासह आपल्या युट्यूब अकाऊंटवरून व्हिडिओ शेअर करत असतो. दरम्यान आयपीएल २०२६ स्पर्धेसाठी होणाऱ्या लिलावापूर्वी आर अश्विनने आपल्या एक्स अकाऊंटवरून बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचा फोटो शेअर केला आहे, जो सध्या तुफान चर्चेत आहे.
अश्विनने सनी लिओनीचा फोटो शेअर करताच सोशल मीडियावरच एकच चर्चा रंगली आहे, ती म्हणजे अश्विनने हा फोटो का शेअर केला? दरम्यान या फोटोवर नेतकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने अक्षय कुमारच्या चित्रपटातील एक मीम शेअर केला आहे. ज्यात तो, “भाई साहब किस लाईन मे आ गये आप?” असं लिहिलं आहे. मात्र अश्विनने ही पोस्ट शेअर करण्यामागचं कारण जरा वेगळं आहे.
अश्विनने ही पोस्ट शेअर करण्यामागचं नेमकं कारण काय?
अश्विन हा सर्वात हुशार क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याने एका खेळाडूचं नाव सुचवण्यासाठी सनी लिओनीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये एका बाजूला सनी लिओनी तर दुसऱ्या बाजूला तामिळनाडूची राजधानी असलेल्या चेन्नईतील एका रस्त्याचा फोटो शेअर केला आहे. या रस्त्याचं नाव संधू स्ट्रीट असं आहे. त्यामुळे त्याने नाव न घेताच सनी संधूचं नाव सुचवलं आहे.
आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, हा सनी संधू आहे तरी कोण? सनी संधू हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये तमिळनाडू संघाकडून खेळतो. आयपीएल मिनी ऑक्शन २०२६ सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. १६ डिसेंबरला या आगामी आयपीएल २०२६ स्पर्धेसाठी ऑक्शन होणार आहे. त्यामुळे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर मोठी बोली लागू शकते. दरम्यान ८ डिसेंबरला झालेल्या सामन्यात संधूने ९ चेंडूत ३० धावांची तुफानी खेळी केली.
आयपीएल २०२६ स्पर्धेसाठी होणाऱ्या लिलावात ३५० खेळाडूंवर बोली लागणार आहे. या खेळाडूंमध्ये सनी संधूच्या नावाचा देखील समावेश आहे. त्याची बेस प्राईज ३० लाख रूपये इतकी आहे. त्यामुळे अन्कॅप्ड खेळाडूंच्या यादीत त्याच्यावर मोठी बोली लागू शकते.
